मुंबई: शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं. त्यांनी केलं ते खूप चुकीचं केलं. आता त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणासोबत असं घडू नये असं त्या म्हणाल्या. 


भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) केला होता. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


काय म्हणाल्या सारिका गायकवाड? 


महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड म्हणाल्या की, महेश गायकवाडांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर चांगलं वाटतंय. पण गणपत गायकवाड यांनी जे काही केलं ते चुकीचं केलं. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून इतर कुणासोबत अशी घटना घडणार नाही. 


महेश गायकवाडांच्या स्वागतासाठी शहरभर बॅनर


महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण 10 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) हलविण्यात आले होते. 


गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी


या गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून देण्यात आलेली आहे. सध्या सर्व आरोपीना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळोजा कारागृहात हलविण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे येणाऱ्या काळात कल्याण - डोंबिवली मतदार संघात शिवसेना आणि भाजप असा आमना सामना पाहायला मिळणार आहे. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेते मंडळी यांनी देखील उपचारादरम्यान भेटून गेले होते.


दरम्यान, आज संध्याकाळी सहा वाजता महेश गायकवाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे (Press Conference) आयोजन करण्यात आले आहे. महेश गायकवाड हे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


ही बातमी वाचा: