Protest Against AC Local: मध्य रेल्वेने नेहमीच्या लोकल रद्द करून एसी लोकल सुरू केल्याने नाराज असलेल्या कळवा-मुंब्रातील रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नेहमीच्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल मध्य रेल्वेने सुरू केल्या होत्या. यामुळे संतप्त प्रवाशांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने या एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. आज कळवा येथे आज रेल्वे प्रवाशांची परिषद पार पडली. या परिषदेत मध्य रेल्वेविरोधात आंदोलनाचा  इशारा देण्यात आला. 

Continues below advertisement

कळव्यातील कावेरी सेतू इथे ही परिषद पार पडली. या परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. मागील काही दिवसांत कळवा आणि बदलापूर इथे एसी लोकल विरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींनीदेखील याची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर आजची परिषद महत्त्वाची मानली जात होती. ठाणे, कळवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, टिटवाळा तसेच मुंबईतील अनेक प्रवासी संघटना आणि सामान्य प्रवासी आज उपस्थित होते. 

यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आंदोलन केल्याशिवाय काही होत नाही, काही महिला प्रवाशांनी आंदोलन केले. त्यामुळे ही एसी लोकल बंद करावी लागली. ज्यावेळी नेतृत्वाशिवाय आंदोलन होते त्यावेळी आंदोलन पसरण्यासाठी वेळ लागत नाही. एसी लोकलमधून सहा हजार प्रवाशी प्रवास करू शकत नाही. त्यासाठी साध्या लोकल हव्यात. एसी लोकलच्या फेऱ्यांविरोधात झालेले आंदोलनातील वेदना केवळ कळवा प्रवाशांच्या नाहीत. बदलापूरमध्येही आंदोलन झाले. पश्चिम रेल्वेवरही प्रवाशांनी आंदोलन केले. हा जनक्षोभ एक बॉम्ब असून वात दिसतेय. त्याला कधीही आग लागू शकते. 

Continues below advertisement

एसी लोकलविरोधात आंदोलनाचा इशारा

साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करून एसी लोकल सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आम्ही काही करणार नाही. फक्त रेल्वे ट्रॅकवरून चालत ठाण्याला जाणार आणि रेल्वे चालू देणार नाही. सकाळी पाच वाजताच्या अंबरनाथ लोकलने मी 7 वर्ष प्रवास केला आहे. या लोकलचे महत्त्व माहीत आहे. ती लोकल बंद करणे म्हणजे तद्दन मुर्खपणा असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.