Dombivli News : डोंबिवलीतील (Dombivli) खंबाळपाडा परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. झोपेत असताना सर्पदंश झाल्याने प्राणवी भोईर (वय 3) या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत झोपलेल्या मावशीलाही साप चावल्याचे निदर्शनास आले होते. आता मावशीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. 

Continues below advertisement

ही दुर्दैवी घटना डोंबिवलीच्या आजदे गावात घडली. प्राणवी तिची मावशी श्रुती ठाकूरसोबत झोपली होती. झोपेत असताना सापाने चावा घेतल्याने प्राणवी अचानक जोरजोरात रडू लागली, मात्र सुरुवातीला काय घडलंय हे कळत नव्हतं. तिच्या आईकडे दिल्यानंतर काही वेळात श्रुतीलाही साप चावल्याचं लक्षात आलं. तेव्हाच प्राणवीवरही सर्पदंश झाल्याचा संशय पक्का झाला. तत्काळ दोघींनाही डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला दोघींची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, काही वेळात प्राणवीची प्रकृती बिघडली, आणि तिला ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथेच तिचा मृत्यू झाला.

मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू (Dombivli News)

श्रुती ठाकूरवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल रात्री उशिरा तिचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या 24 वर्षांची तरुणी आणि तिची 3 वर्षांची भाची अशा दोघींच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Continues below advertisement

नातेवाईकांचा संताप, केडीएमसी रुग्णालयावर निष्काळजीपणाचे आरोप (Dombivli News)

या दुहेरी मृत्यूनंतर नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी KDMC च्या रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. सर्पदंशावर योग्य उपचार न दिल्यामुळे, वेळेत अँटी-स्नेक डोस न दिल्यामुळे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राणवीच्या मृत्यूनंतरही श्रुतीवर आवश्यक त्या प्राथमिक वैद्यकीय उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाला, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर संतप्त कुटुंबीयांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला आणि जबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली.

वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया (Dombivli News)

या प्रकरणावर केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "दोन्ही रुग्णांवर सर्पदंशावरील उपचार करण्यात आले. अँटी व्हेनम इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी प्राणवीला ठाण्यात हलवण्यात आलं. नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल," असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Dombivli Crime: डोंबिवलीत शिंदे गटाच्या नेत्यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप, शरद पवार गटाचा नेता संशयाच्या भोवऱ्यात