ठाणे : युतीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नाला उत्तर देताना  मनसे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीत मोठं वक्तव्य केले आहे. आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरुन तारा जुळल्या की सर्व जुळून येईल असं आमदार राजू पाटील यांनी उत्तर दिलंय. त्यामुळे मनसे आणि शिंदे- भाजप युती होणार का याची पुन्हा एकदा चर्चेला उधाण आला आहे.


खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल संध्याकाळच्या सुमारास डोंबिवली येथील फडके रोड संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमानंतर खासदार शिंदे यांनी जवळच असलेल्या मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर शिंदे गट-भाजप-मनसे युतीबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यापाठोपाठ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील मनसे कार्यालयाला भेट दिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले होते. 


याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, "फडके रोड येथे सर्व संस्थांचे कार्यक्रम होत असतात. चांगल्या सणाच्या वेळी कुणी आडकाठी करत नाही, तशी आपली संस्कृती पण नाही. काल खासदार श्रीकांत शिंदे फडके रोड येथे आले होते. मनसे शहर अध्यक्षांनी त्यांना मनसे कार्यालयात येण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन ते आले. आम्ही राजकारणात जरी विरोधक असलो तरी दुश्मन नक्कीच नाही." 


आमदार राजू पाटील पुढे म्हणाले की, "वैयक्तिक असं काही नसतं, एकमेकाला चांगल्या शुभेच्छा आम्ही नेहमीच देत असतो. युती करायची की नाही करायची तो सर्वस्वी निर्णय राज ठाकरेंचा आहे. त्यांनी आम्हाला स्वतंत्र लढण्याचा आदेश दिला असून आम्ही ती तयारी करतोय. ती आमची तयारी नेहमीच असते. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्याला युती सोबत जायचंय, तर आम्ही त्यालाही तयार आहोत. मात्र एक निश्चित, इथे आमची मनं जुळली आहेत. वरून तारा जुळल्या की सगळे जुळून येईल."


मनसेच्या मदतीशिवाय कल्याणचा पुढचा खासदार होणार नाही, राजू पाटील यांचा दावा
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पुढची निवडणूक ठाण्यातून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, तर खासदार व्हायला आवडेल का? असं राजू पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले ती, 'मी आमदारकीलाही उभा राहणार नव्हतो, राजसाहेब म्हणाले म्हणून उभा राहिलो, त्यांनी सांगितलं खासदारकीला उभा राहा, तर राहणार. मनसे लोकसभा लढवणार नाही हे आधीच जाहीर केलं होतं, पण आता इथे जो कुणी खासदार होईल, तो मनसेची दखल घेतल्याशिवाय, मनसेच्या मदतीशिवाय होणार नाही, हे नक्की.