CM Eknath Shinde Thane News: राज्यात एकत्र सत्तेत असलेले भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष (Shinde Group) ठाण्यात मात्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले बघायला मिळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहरातच (Thane City) या दोन्ही पक्षांमध्ये एका घटनेमुळे फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 


नवीन वर्षाच्या स्वागताचा बॅनर लावण्यावरून हाणामारी 


ठाण्यातील कशिश पार्क परबवाडी या परिसरात काल संध्याकाळी नवीन वर्षाच्या स्वागताचा बॅनर लावण्यावरून काही लोकांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर आली. मात्र ही मारामारी भाजपचे कार्यकर्ते आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांमध्ये झाल्याचे नंतर स्पष्ट झाले. या घटनेनंतर भाजपचे वागळे स्टेट मंडळ अध्यक्ष प्रशांत जाधव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना झालेली मारहाण ही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यांच्या पत्नी तसेच काही गुंडांनी केल्याचा आरोप जाधव यांच्या भावाने आणि भाजपने केला. 


 पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नाही


ही घटना होऊन बारा तास उलटून गेले तरी देखील वागळे इस्टेट पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल न केल्याने भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आपल्या माजी नगरसेवकांसह पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी कोणाचेही नाव न घेता पोलिसांवर दबाव असून त्यामुळेच कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला. 


भाजपचं ते ट्वीट आज सकाळी डिलिट


या संदर्भात घटना झाल्यानंतर एक ट्वीट देखील ठाणे भाजपाकडून करण्यात आले होते. ज्यामध्ये विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांचे नाव स्पष्टपणे घेतले गेले होते. मात्र आज सकाळी हे ट्वीट अचानक डिलीट करण्यात आले. तर दुसरीकडे संध्याकाळी विकास रेपाळे त्यांच्या पत्नी आणि नम्रता भोसले आपल्या कार्यकर्त्यांसह वागळे स्टेट पोलिसांनी दाखल झाले. आणि त्यांनी प्रशांत जाधव यांच्यावरच मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला. 


यामध्ये भाजपकडून करण्यात आलेली तक्रार लक्षात घेऊन पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केलेला नसून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या लोकांकडून देखील तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय झाला आणि कशामुळे वादावादी सुरुवात झाली हे शोधण्याचे खरे काम पोलिसांवर येऊन ठेपले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीमुळे या दोन्ही पक्षात भविष्यात देखील मोठी ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


ही बातमी देखील वाचा


Thane: शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने भाजप पदाधिकाऱ्याला केली मारहाण