मुंबई : सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिलं आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झालाय, जो विश्वास दीड वर्षा पासून माझ्यावर दाखवला त्यासाठी मी धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया आमदार आपत्रतेच्या निर्णयावर (MLA Disqualification Case) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीये. शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. समोरचे बहुमत असल्याचा कोणाताही पुरावा देऊ शकले नाहीत, तसेच त्यांनी खोटी कागदपत्र दिल्याचं देखील निकालात म्हटलंय.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा असून कोणत्याही गटाचे आमदार अपात्र असल्याचा निकाल दिला. त्यावर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी या निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार देखील मानलेत. घराणेशाही हरली असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?
बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला. पण त्यांना यांनी मांडीवर घेतलं. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिलीये. अध्यक्ष महोदय यांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची भरत गोगावले हे व्हीप म्हणून मान्यता दिली. पण अपात्र केले नाही, यामागे काय कारण हे आम्हाला माहीत नाही. त्यांनी अपत्रतेचा निर्णय द्यायला हवा होता, समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने, कालचा निकाल जो दिलाय तो आम्ही देखील लीगल टीम सोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल - मुख्यमंत्री शिंदे
सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागला तर ठीक नाहीतर सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ले देण्याचे काम ते करतील. कुठेही गेले तरी मेरिट आमच्या बाजूने आहे. त्यामुळे निकाल आमच्या बाजूने दिला. पण अध्यक्षणबाद्दल जे भाष्य त्यांनी केलं ते खालच्या पातळीचंय, त्यांच्या आरोपाला मी उत्तर देणार नाही, पण जनता नक्की उत्तर त्यांना देईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
त्यानंतर मनमानी कारभार सुरु झाला - मुख्यमंत्री शिंदे
बाळासाहेब होते तोपर्यंत सगळ्या गोष्टी नियमात होत्या, मात्र त्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला. नंतर असूया निर्माण झाली. हे होते तेव्हा पक्ष वाढला नाही. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी मागण्याचे पाप देखील त्यांनी केले. त्यामुळे त्यांनी फक्त पैशांशी देणं घेणं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय.