मुंबई: शिवजयंतीनिमित्त मीरा रोड येथे 25 फेब्रुवारीला मिरवणूक काढण्यास तेलंगणातील भाजप आमदार टी. राजसिंग ठाकूर (T.Raja Singh) यांना शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. यात कोणतंही द्वेषयुक्त भाषण करणार नाही, असं हमीपत्र मिरारोड पोलीस उपायुक्तांना देण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठानं या मिरवणूकीस परवानगी देतना या संपूर्ण मिरवणूकीचे तसेच सभेत केलेल्या भाषणांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.


काय आहे प्रकरण?


शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रोड ते सिल्व्हर पार्कपर्यंत मिरवणूक काढण्यास मिरारोड पोलीसांनी परवानगी नाकारल्यानंतर नरेश निळे यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या कार्यक्रमात ठाकूर हे प्रमुख वक्ते आहेत. मात्र नजिकच्या काळात घडलेल्या घटनांनंतर या मिरवणुकीत  काही अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भीती सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या याचिकेला विरोध करताना व्यक्त केली. 


22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठावेळी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं. ठाकूर यांच्याविरोधात द्वेषयुक्त भाषणं दिल्याबद्दल तेलंगणातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही अनेक गुन्हे दाखल असल्याकडेही वेणेगावकर यांनी हायकोर्टाचं लक्ष वेधल.


मात्र, ठाकूर यांच्याविरोधात तेलंगणा, महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये अनेक खटले दाखल असले तरी, 17 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने अँड. सुरेश कुलकर्णी आणि अँड. विनोद सांगवीकर यांनी कोर्टाला दिली. त्यांना सोलापुरातही रॅली काढण्याची परवानगी मिळाली होती आणि त्या रॅलीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचंही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.


कोर्टाचा निर्वाळा 


दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यांनतर, आम्हाला वस्तुस्थितीची जाणीव असून ठाकूर त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाकूर यांनी रॅली, कार्यक्रमांमध्ये भाषणं देऊनही त्याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नसल्याचं नमूद करत हायकोर्टानं या नियोजित कार्यक्रमाला सशर्त परवानगी दिली.


तेलंगणा भाजपचे आमदार टी राजा सिंह हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल प्रसिद्ध आहेत. या आधी सोलापुरात त्यांनी जाहीर सभेत एका समूदाराबद्दल धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं होतं. 


ही बातमी वाचा: