नवी मुंबई :  मुंबई – बडोदा  महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये दलालांनी हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवंडी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या  जमिनी  गेल्या  आहेत,  त्यामुळे  जमिनी   गेलेल्या   शेतकऱ्यांना  राज्य   सरकारकडून   त्यांचा   मोबदला  देण्यात आला आहे.  आहे. धक्कादायक बाब म्हणजे  यापूर्वी   महामार्गाच्या  भूसंपादनामध्ये   बाधित  होणाऱ्या  शेतकऱ्यांच्या  जागी  बनावट  शेतकरी  उभे  करून सुमारे  12  कोटी रुपये  हडपल्याची घटना समोर आली होती.  पुन्हा एकदा भिवंडी उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून एका वयोवृद्ध मृत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी दलालांच्या साखळीने मृत महिलेच्या जागी एका महिलेच्या नावाने  बनावट कागदपत्रे तयार  उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिवंत दाखवून  तब्बल 58 लाख रुपये दलालांच्या साखळीने हडप केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. 


अजब घोटाळा आता मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात..


'मुंबई –बडोदा' महामार्गातील अजब घोटाळा आता, मुख्यमंत्री शिंदेंच्या दरबारात गेल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे.  त्यामुळे लवकरच संबधित जमीन घोटाळा करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या  दलालांच्या साखळीवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी सुरु केली आहे.


भूसंपदानातील अनेक व्यवहार बाबत साशंकता


मुंबई बडोदा  महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात असल्याने  यामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपादीत शेतजमिनीस बाजारभावापेक्षा पाच पटीने दर देण्याचे धोरण केंद्र व राज्य सरकारने ठरवले आहे. या धोरणानुसार आतापर्यंत कोट्यवधी रुपये बहुतांश  बाधित शेतकऱ्यांना मिळाले असताना, या संधीचा फायदा घेत काही राजकीय दलालांच्या टोळीने  शासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी यांनी संगनमताने या पैशांवर  डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यानंतर भूसंपदानातील अनेक व्यवहार बाबत साशंकता व्यक्त केली  जात असतानाच,  जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी  दलालांच्या साखळीने मृत महिलेला जिवंत दाखवण्याचा अजब प्रकार भिवंडी तालुक्यातील दुगाड गावात समोर आला.


वृद्ध महिलेचं 20 एप्रिल 2011 मध्येच निधन


या गावातील मृत ठकी सख्या सवर या महिलेची मौजे दुगाड येथील शेतजमीन सर्व्हे क्रमांक 120/3 व 5 व 120/3 अ असे मिळून एकूण 3000 चौरस मीटर क्षेत्र बाधित होत असल्याचे शासकीय कागदपत्रांवरून सिद्ध झाले. परंतु ठकी सवर ही आदिवासी वृद्ध महिला 20 एप्रिल 2011 मध्येच निधन झाल्याचे  दुगाड ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे. असे असतानाही काही दलालानी  भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात 2 मे 2018 रोजी या मृत  महिलेच्या जागी भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस उभे करून तीच ठकी सवर जीवंत असल्याचे  मोबदला मिळणे कामी प्रकरण सादर केले. 


बनावट बँक खात्यात 58 लाख 42 हजार 996 जमा


त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने 6 ऑगष्ट 2021 रोजी प्रकरण मंजूर करून ठकी सवर हिच्या नावे प्रत्येकी दोन्ही प्लॉट मिळून 64 लाख 92 हजार 218 रुपये मंजूर करून त्यापैकी 10 टक्के रक्कम कपात करून मयत ठकी सवर हिच्या नावे उघडण्यात आलेल्या बनावट बँक खात्यात 58 लाख 42 हजार 996 जमा करण्यात आले. या प्रकरणात दलालांच्या साखळीने  मृत  ठकी या महिलेच्या जागी गावातील भागीरथी मुकणे या वयोवृद्ध महिलेस प्रांत कार्यालयात उभे करून ठकीच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आले.  तर भागीरथी या महिलेच्या फोटोचा वापर करून प्रतिज्ञापत्र व इतर कागदपत्रे तयार केली. 


32 लाख  रुपये शासनाला  परत करण्याच्या नोटिसीमुळे घोटाळा उघड.. 


मृत ठकी सख्या सवर यांच्या  जमिनीचा मोबदला दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या तपासणीत सदर सर्व्हे क्रमांक 120 / 3 व 5 हा दुबार नोंदविला गेला असल्याने रद्द केल्याचे  लक्षात आले. त्यानंतर  प्रांत अधीकारी  वाकचौरे यांनी 29 ऑगष्ट 2022 रोजी मृत ठकी सवर हिच्या नावे नोटीस बजावून जादा दिली  गेलेली  32 लाख 46 हजार 109 रुपये शासनाला  परत करण्या बाबत नोटीस बजावली होती. मात्र  सदरची नोटीस भागीरथी मुकणे हिचा नातू किरण सुनील मुकणे या नातवाच्या हाती पडताच, त्याला प्रश्न पडला की,  आपली जमीन नसून आपण पैसे घेतलेले नसताना आपल्याला नोटीस का बजावण्यात आली. या नोटिसीमुळे गोंधळलेल्या किरणने गावातील श्रमजीवी संघटनेचे कातकरी घटक जिल्हा प्रमुख जयेंद्र गावित यांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी या बाबत भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठपुरावा केल्याने हा बनाव उघडकीस आला आहे .


मृत ठकीचे भूत  सरकारच्या  पैश्यावर डल्ला मारून उधळपट्टी करीत होते का?


धक्कादायक बाब म्हणजे मृत ठकीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात केवळ सोळाशे रुपये शिल्ल्क असल्याचे समोर आले. याचा श्रमजीवीने बँकेत जाऊन तपास केला असता, मृतच्या खात्यातून दागिने, पेट्रोलपंप आणि ढाब्यावर मेजवानीचे ऑनलाईन लाखोंची रक्कम अदा केल्याचेही समोर आले. त्यामुळे मृत ठकीचे भूत  सरकारच्या  पैशांवर डल्ला मारून उधळपट्टी करीत होते का? असा सवालही श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारींनी उपस्थित केला.   


भागीरथीच्या  आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार तसाच कायम


ज्या भागीरथी मुकणे या वृद्ध महिलेस मृत ठकी म्हणून उभे करणाऱ्या दलालांच्या साखळीने लाखो रुपये हडप केले. मात्र   भागीरथीच्या  आयुष्यातील दारिद्र्याचा अंधार तसाच कायम असून ती आपल्या झोपडी बाहेर आपल्या गरिबीतील जिणे जगत आहे . या संपूर्ण प्रकरणात गैरव्यवहार एकटा खाजगी व्यक्ती करून अशा पद्धतीने पैसे हडपण्याची हिंमत करू शकणार नसून त्यामध्ये शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचा सुध्दा सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केला आहे. अशा सर्व प्रकरणांची तपासणी करून, सत्य समोर येण्याची मागणी केली करीत गैरव्यवहार करणाऱ्या जमीन दलाल व शासकीय अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे .


आणखीही जमीन घोटाळे समोर येणार 


ठाणे  जिल्ह्यात  समृद्धी  महामार्ग ,  बुलेट  ट्रेन  मार्ग,  मुंबई – बडोदा  महामार्ग  अश्या  अनेक  विकास  प्रकल्पाचे  कामे  सुरु आहेत.  याच वर्षी  आणखी एक 12 कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्याचा  मुख्य  आरोपी  नायब  तहसीलदार  विठ्ठल  गोसावी यांच्यासह 14 ते 15 दलालावर गुन्हे दाखल करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर  तत्कालीन  उपविभागीय  अधिकारी  मोहन  नळदकर  यांचीही  कारकीर्दी  वादग्रस्त  ठरली  होती.  त्याच्या  काळात  समुद्धी  महामार्गात  शेतकऱ्यांच्या  जमिनी  गेल्या  होत्या.  त्यामध्येही  मोठा  घोटाळा  झाल्याच्या  अनेक  तक्रारी  पीडित  शेतकऱ्यांनी  केल्या  आहेत.  मात्र  त्या  तक्रारीचे  पुढे  काय  झाले  हेही  गुलदस्ताच  राहिल्याने  भिवंडी  उपविभागीय  कार्यलय  कायमच  चर्चेत  राहिले  आहे.