भिवंडी : भिवंडी (Bhiwandi) शहरात बनावट जिरे (Cumins Seeds) विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर शांतीनगर पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये 7 लाख 19 हजार 700 रुपये किमतीचे 2,399 किलो बनावट जिरं शांतीनगर पोलिसांनी जप्त केलंय. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. शादाब इस्लाम खान वय 33 वर्ष आणि चेतन रमेशभाई गांधी वय 34 वर्ष अशी या आरोपींची नावे आहेत.
जिरं हे स्वयंपाकात आणि फोडणीसाठी वापरण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा जिन्नस आहे. पण आता बाजारात बनावट जिरं विक्रीसाठी आल्याचं समोर आलं आहे. तसेच बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत बाजारात बनावट जिरे उपलब्ध आहे. अनेक जण जिऱ्याचा वापर वजन कमी करण्यासाठी तसेच खाद्यपदार्थांमध्ये करतात. परंतु केमिकलचा वापर करुन बनावट जिरं तयार करण्यात येत असल्याची माहिती समोर आलीये. हे बनावट जिरे आरोग्यासाठी अत्यंत धोकायदाक ठरु शकते. त्यामुळे पोलिसांनी करवाई करत या जिऱ्याच्या कंपनीला टाळं ठोकलं.
बनावट जिरं कसं ओळखावं?
जर तुम्ही बनावट जिरं पाण्यात टाकलं तर ते मळकट रंगाचे दिसते आणि पाणीही गढूळ होते. तसेच जर खरं जिरं पाण्यात टाकलं तर ते स्वच्छ आणि पिवळसर रंगाचे दिसते. त्यामुळे जर तुम्ही जिरे खरेदी करत असाल तर बनावट जिरे अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता. यामुळे तुमची फसवणूक देखील होणार नाही.
नेमकं प्रकरण काय?
शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 90 फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे आणि पोलीस शिपाई क्षीरसागर यांना मिळाली होती. शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी सापळा रचला आणि त्यांना टेम्पोत बनावट जिरे असल्याचे लक्षात आहे. याच टम्पोवर कारवाई करत पोलिसांनी 80 गोन्यांमधून 7 लाख 19 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सुमारे साडेतीन टन बनावट जिरे असून 4 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बनावट जिऱ्याची फॅक्ट्री सुरु
आरोपी चेतन गांधी याने मे.जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर जि.पालघर या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्टरी सुरु केली होती.बडीशेपचा टाकाऊ हिस्सा आणि लाकूड यात केमिकल व केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हे जीरे बनवण्यात येत होते. तसेच यासाठी लागणारा कच्चा माल हा गुजरातमधून उंचा येथून येत होता. त्यानंतर बनावट जिरे बनवून पैरट या ब्रँड कंपनीच्या नावाने बाजार भावाच्या अर्ध्या किंमतीत विकला जात होता. दुसरीकडे या पाकिटावर कोणत्याही प्रकारची एक्सपायरी डेट नसून सर्रासपणे बाजारात विक्री करण्यात येत होती. आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यावसाय सुरु केला होता.
नवी मुंबईच्या मार्केटमध्ये जीरे विक्रीसाठी
वाशी ,नवी मुंबई एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल, धाब्यांवर हे जिरे विक्रीसाठी पाठवण्यात येत होते. धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्याचा सर्रास वापर केला जात असल्याचं देखील समोर आलं होतं. शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील बंद केले असून आरोपींना न्यायालयात हजर केले. या आरोपींना 27 जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.