Continues below advertisement

ठाणे : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Bhiwandi Municipal Corporation) शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा आणि निर्णायक बदल झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर निश्चित झाली आहे. या युतीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व 90 जागा लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिवसेनेने भिवंडीत कधीही सर्व जागा लढवल्या नव्हत्या. त्यामुळे हा निर्णय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडीनंतर भिवंडीचा राजकीय आखाडा तापताना दिसत आहे. 2017 च्या भिवंडी महापालिका सभागृहातील 12 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मनसेसोबत युती करत सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.

Continues below advertisement

Bhiwandi Nizampur City Municipal Corporation : ठाकरे 90 तर मनसे 10 जागा लढवणार

युतीच्या अंतिम सूत्रानुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गट 80 जागांवर, तर मनसे 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. सुरुवातीला मनसेकडून 20 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाणे आणि भिवंडी येथे झालेल्या बैठकीनंतर चर्चेअंती 10 जागांवर एकमत झाल्याने जागावाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेना-मनसे युतीकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भिवंडी महापालिका निवडणूक एकत्रित लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची वरिष्ठ पातळीवर युती घोषित झाली आहे. परंतु स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे यावेळी भिवंडी महापालिका निवडणूक बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाल्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भिवंडीत नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. त्यामुळे भिवंडीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं दिसंतय.

ही बातमी वाचा: