ठाणे : भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी विधानसभेत केला. यावरुनच भाजप आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) आणि भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. 


काय आहे प्रकरण? 


भिवंडीतील मौजे कणेरीतली सर्व्हे नंबर 26 ही जागा गोपाळ गणेश दांडेकर ट्रस्टची खाजगी मालमत्ता आहे.त्या जागेची खोटी कागदपत्रं सादर करुन, तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जात आहे, यावरून लोकांचा उद्रेक होत असून याची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी आणि तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही योगेश सागर यांनी केली. 


भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी योगेश सागर यांच्या मुद्द्याला हरकत घेऊन सदर जागा मुंबई महापालिकेनं उपलब्ध करुन दिल्याचं म्हटलं. याशिवाय या जागेबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठका घेतल्या होत्या, तसेच या जागेसाठी शासनाकडून निधीही उपलब्ध करण्यात आला होता असा दावा रईस शेख यांनी विधानसभेत केला. जर योगेश सागर यांचा मुद्दा वैध असेल तर शासनपत्रक आणून संबंधित काम थांबवलं जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणी मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.


दांडेकर ट्रस्टची बाजू काय? 


या प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
 
ट्रस्टने त्यांच्या तक्रारीत म्हटल्यानुसार, ट्रस्टच्या मालकीची एकूण नऊ एकर जमीन असून सदरच्या जमिनीवर हनुमानाचं मंदिर आहे. या जमिनीचा वापर पूर्वीपासून सामाजिक कामांसाठी केला जातो. या जमिनीपैकी काही भागांवर अतिक्रमणं झाली असून भिवंडी मनपा प्रशासन आणि संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा कळवले आहे. आमच्या ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवर शासनाच्या निधीतून कब्रस्तान तयार करण्यात आलं असून त्याला आमचा तीव्र विरोध आहे. ही जमीन शासनाची दिशाभूल करून बळकावण्याचा प्रकार असून बेकायदेशीर कब्रस्तानामुळे परिसरातील सर्वसामान्य जनतेमध्ये रोष परसल्याचं दिसतंय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते तसेच धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची त्वरीत दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: