ठाणे : चालक कारच्या काचा लावून व्हिडीओ पाहत कार मागे-पुढे करता असतानाच कारच्या मागच्या बाजूने खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालिकेच्या अंगावर कारचे चाक जाऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही  घटना भिवंडीतील  एका हाय प्रोफाईल सोसायटीत सुरु असलेल्या लग्नाच्या सभारंभात घडली आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अलिना अकरम मंसूरी (वय चार वर्ष) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. मात्र या घटनेमुळे लग्न सभारंभारत दुःखाचा सावट पसरले होते. 


मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या बागे यूसुफ इमारतीच्या 12 मजल्यावर राहणाऱ्या समसुल्लाह मंसूरी यांच्या मुलाचा निकाह सभारंभा 5 जून रोजी सायंकाळच्या सुमारास होता. त्या निकाह सभारंभाची तयारी सुरू असतानाच, सभारंभासाठी अनेक पाहुणे मंडळी आली होती. यामध्ये  नालासोपाराहुन मोहम्मद अकरम मंसूरी हे मृत बालिकेचे वडील परिवारसह सायंकाळी 7 च्या दरम्यान आले होते.  त्यावेळी बागे यूसुफ इमारतच्या आवारात असलेल्या हॉलमध्ये निकाह नंतर वलिमा  सभारंभासाठी पाहुण्यांचा जमाव जमला होता.  त्याच सुमाराला एका फॉर्च्यूनर कारमध्ये दुसरे कुटूंब आले होते. हे कुटूंब कार मधून उतरले.  त्यानंतर चालक  कार घेऊन पार्किंगमध्ये उभी करण्यासाठी जात होता.


 त्यावेळी त्याने कारच्या काचा लावून व्हिडीओ पाहतंच कार रिवर्समध्ये घेतली. ड्रायव्हर व्हिडीओ पाहण्यात गुंग असल्याने त्याचे लक्ष कार मागे खेळणाऱ्या मुलांवर नव्हते. मृत अलीना कारच्या मागे खेळण्यात मग्न होती. त्याच वेळी अचानक   चालकाने कार  रिवर्स  घेतली आणि अलीनाला जोरदार धडक दिल्याने ती  फॉर्च्यूनर कारच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी चालकाला जोरजोरात आवाज देऊन कार थांबविण्यास सांगत होते. मात्र कारच्या काचा बंद होत्या आणि चालक व्हिडीओ पाहण्यात दंग असल्याने त्याने कार पुढे घेऊन पुन्हा  रिवर्स घेतल्याने दुसऱ्यांदा कारचे चाक बालिकेच्या अंगावरून गेले. या घटनेनंतर निकाह सभारंभात एकच खळबळ उडून गोंधळ उडाला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत बालिकेला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता येथील डॉक्टरानी तिला तपासून मृत घोषित केले. 


निकाह सभारंभारत दुःखाचा सावट पसरले ..


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराटे घटनास्थळी  दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृत बालिकेचे वडील मोहम्मद अकरम मंसूरी यांच्या तक्ररीवरून कार चालकावर  गुन्हा  दाखल करून तपास सुरू केला.  मात्र या घटनेमुळे निकाह सभारंभारत दुःखाचा सावट पसरले होते.