मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील बड्या आरोपींना वाचवलं जातंय, फरार संस्थाचालकांना अद्याप अटक केली जात नाही असा आरोप मृत अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला. बदलापूर प्रकरणात पोलिसांकडून अक्षय शिंदे आणि शाळा व्यवस्थापन यांच्याबाबत भेदभाव केला जात असून शाळेतीली सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे नष्ट केले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपी संस्थाचालकांचा अटकपूर्व जामीन नाकारला गेला आहे. 


पुरावे नष्ट केले गेले, पण शाळेवर कारवाई नाही


पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आले नसल्याचा आरोप अक्षय शिंदेचे वकील अॅड. अमित कटारनवरे यांनी केले. ते म्हणाले की, बदलापूर प्रकरणात मोठ्या माशांना वाचवलं जातंय. अक्षय शिंदेच्या कुटुंबाला न्याय मिळावाच. मात्र या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी. शाळा व्यवस्थापन आणि अक्षय शिंदे या आरोपींबाबतचा भेदभाव समोर आला आहे. घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनानं पोहोचवला नाही. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. अशा परिस्थितीत पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आले नाहीत. पोलिसांना अद्यापही शाळा व्यवस्थापनातील आरोपी सापडत नाहीत. त्यांना अटक केली जात नाही. 


पीडित मुली अद्याप शाळेत जाऊ शकल्या नाहीत


अत्याचार पीडित कुटुंबाच्या वकील अॅड. कविशा खन्ना म्हणाल्या की, शाळा व्यवस्थापनातील जे आरोपी फरार झाले आहेत त्यांनी आपल्या वकिलांकरवी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल  केला. मात्र कोर्टानं तो फेटाळला आहे. गरज असेल तर आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागू.  


बदलापूर प्रकरणातील पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकत नाहीत असं सांगत अॅड कविशा खन्ना म्हणाल्या की, ज्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रार केली होती त्यांच्याकडून दिलासा मिळाला नव्हता. आता तर शाळा व्यवस्थापनातील आरोपीही फरार आहेत. त्यामुळे पिडीत मुली अद्यापही शाळेत जाऊ शकल्या नाहीत. सामान्यरुपात त्या इतक्यात शाळेत जाऊ शकणार नाहीत. 


फरार संस्थाचालकांना अटकपूर्व जामीन नाकारला


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या दोन संस्थाचालकांचा हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. बदलापूर प्रकरणातील प्रमुख आरोप अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला असून इतर फरार आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. आरोपी बनवण्यात आलेले संस्थाचालक आणि सचिव यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका हायकोर्टानं फेटाळली. 


बदलापूर अत्याचार प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा आणि घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा या दोघांवर आरोप आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. घटनेच्या महिनाभरानंतरही आरोपींचा शोध घेण्यात तपासयंत्रणेला अपयश आलं आहे. सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. 


ही बातमी वाचा: