मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर आता त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही फटाके फोडले नाहीत तो बंदूक हिसकावून गोळीबार कसा करेल असा प्रश्न मृत अक्षय शिंदेच्या आईने केला आहे. तर बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळा जबाबदार असून त्यांनीच पैसे देऊन अक्षय शिंदेला ठार मारल्याचा आरोप त्याच्या काकांनी केला. 


बदलापूर प्रकरणाला अक्षय दोषी नाही, त्यामागे वेगळेच लोक असल्याचा आरोप पालकांनी केला. या प्रकरणाला शाळा जबाबदार आहे, तसेच जे सहा जण फरार आहेत ते जबाबदार असल्याचा आरोप अक्षयच्या पालकांनी केला. 


शाळेनेच पैसे देऊन ठार मारलं


अक्षय शिंदेचे काका अमर शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, बदलापूरमधील शाळेत जो अत्याचार झाला त्याला शाळाच जबाबदार आहे. या प्रकरणात सहा जण फरार असून तेच खरे आरोपी आहेत. अक्षयवर गुन्हा सिद्ध झाला नव्हता त्यामुळे तो आता सुटणार याची खात्री त्यांना झाली होती. त्यामुळे शाळेनेच पैसे देऊन देऊन त्याला मारून टाकलंय. या प्रकरणात आम्हाला न्याय हवा. शाळा प्रशासनाला शिक्षा झाली पाहिजे. 


अक्षयच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्याची काही माहिती नव्हती, या प्रकरणी अक्षयवर खोटे आरोप ठेवण्यात आले आणि त्याचं राजकारण केल्याचा आरोप पालकांनी केला. अक्षय जर गुन्हेगार होता तर इतर सहा जण फरार का झालेत असा सवालही त्यांनी विचारला. 


अक्षयचे वडील आण्णा शिंदे यांनी म्हटलं की, माझं पोरगं असं काही करूच शकत नाही. ज्याला फटाके वाजवता येत नाहीत तो बंदूक काय हिसकावणार? अक्षयने कधीही गाडी चालवली नाही, मग तो बंदूक कशी चालवणार? माझ्या मुलावर जे आरोप लावलेत ते खोटे आहेत. 


अक्षयला काहीतरी पेपर लिहून दिले होते


अक्षय शिंदेला भेटण्यासाठी त्याचे आई आणि वडिल सोमवारी सकाळी 10 वाजता तळोजा जेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना टोकण देण्यात आलं. पण सायंकाळी 3.30 वाजता त्यांची भेट झाली. ही भेट 20 मिनिटांसाठी होती. त्यावेळी अक्षयने पालकांकडून खर्चासाठी 400-500 रुपये मागितले. त्यासाठी सहकारी कैद्याचा नंबरही दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी अक्षयला एका कागदावर काहीतरी मोठा मजकूर लिहून दिला होता. पण त्यामध्ये नेमकं काय लिहिलंय होतं ते अक्षयलाही माहिती नव्हतं आणि त्याच्या पालकांनाही माहिती नव्हतं अशी माहिती त्याच्या पालकांनी दिली. 


अक्षयचा एन्काऊंटर झाल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिली नाही. सायंकाळी 7 वाजता माध्यमांमध्ये त्याची माहिती मिळाली असंही त्याच्या पालकांनी सांगितलं. 


अक्षय शिंदेचा एन्काऊंटर


बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


ही बातमी वाचा: