Continues below advertisement

ठाणे : कल्याणमधील अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये (Ambernath Nagarpalika Election) मोठी घडामोड घडली आहे. बोगस मतदानासाठी बाहेरुन आणण्यात आलेल्या 174 महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या महिलांना ज्या मॅरेज हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच्या मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. या मॅरेज हॉलच्या मालकाचं नाव कृष्णा रसाळ असं असून तो शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे.

अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने 200 पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपा केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Continues below advertisement

Ambernath Election : महिलांवर गुन्हे दाखल

पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणी 174 महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली बेकायदेशीर गर्दी ,बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या कालमांतर्गत अंबरनाथ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र या महिलांना भिवंडी येथून कणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं, यामागचा सूत्रधार कोण याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.

Ambernath BJP Vs Shivsena : शिंदेंच्या उमेदवारावर गुन्हा

सध्या या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. मात्र या महिलांचे भिवंडीचे जे कनेक्शन आहे त्या संदर्भात सखोल तपास करून जी माहिती पुढील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. शिवाय ज्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये या सगळ्या महिला थांबल्या होत्या, त्याचे मालक आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

Ambernath Rada : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसनेनं केला होता. यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. तसंच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचंही पहायला मिळालं.

ही बातमी वाचा: