ठाणे: ठाण्यातील मुंब्रामध्ये धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. 3 वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरुन कुत्रा पडल्याने तिचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. 


मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेसन इमारतीच्या 5 व्या मजल्यावरुन एक कुत्रा थेट खाली पडला. यावेळी 3 वर्षांची मुलगी आपल्या आईसोबत रस्त्याने चालत होती आणि कुत्रा नेमका या मुलीच्या अंगावर पडला. या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा यावेळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेतील कुत्रा देखील गंभीर जखमी झाला असून त्याला प्राणी रुग्णालयात नेण्यात आले आहे. 


 नेमकं काय घडलं?


सदर घटना मंगळवारी दुपारी 2 वाजता घडल्याचं समोर आलं आहे. मुंब्रामधील अमृत नगरमध्ये चिराग मेंशन इमारतीच्या टेरेसवर जैद सय्यद नावाचा व्यक्तीने कुत्रा पाळला होता. 6 ऑगस्ट, मंगळवारी दुपारी हा कुत्रा अचानक पाचव्या मजल्यावरुन खाली कोसळला. यादरम्यान रस्त्यावरुन आईसोबत जाणाऱ्या 3 वर्षांच्या जाणाऱ्या मुलीच्या अंगावर हा कुत्रा पडल्याने तिचा या घटनेत मृत्यू झाला. कुत्रा अंगावर पडताच सदर मुलगी जागेवरचं बेशुद्ध पडते. यामुळे आई ताबडतोब डॉक्टरांकडे जाते. परंतु मुलीचा दुदैवी मृत्यू होतो. कुत्रा देखील खाली पडल्यानंतर काहीकाळ बेशुद्ध होता. परंतु थोड्यावेळाने कुत्रा जागेवरुन उठल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे.