Kalyan News : एकीकडे राजकीय अनास्था आणि दुसरीकडे कोविड संकटामुळे मोडलेले आर्थिक कंबरडे त्यापाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे अडचणीत असणाऱ्या महाराष्ट्राच्या लालपरीचे विघ्न दूर करण्यासाठी अखेर विघ्नहर्ता धावून आल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2022) कोकणात (Konkan) जाण्यासाठी यंदा कल्याण एसटी डेपोमध्ये (Kalyan ST Depot) झालेले बुकिंग पाहता त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कल्याण एसटी आगारातून तब्बल 369 बसची बुकिंग झाली आहे. यामध्ये राजकीय पक्षांनी तसंच प्रवाशांनी देखील बसचं बुकिंग केलं असून अजूनही बुकिंग सुरु असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापनाने दिली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी तब्बल 200 हून अधिक बसेस बुक केल्या आहेत .


खासदार श्रीकांत शिंदेंकडून 200 हून अधिक एसटी बस बुक
कोरोनामुळे प्रवासावर आलेले निर्बंध त्यापाठोपाठ राज्यव्यापी एसटी कामगारांचा संप त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला होता. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली आहे. गणेशोत्सवामुळे एसटीला बाप्पाच पावल्याचं दिसून येत आहे. एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नातं आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळही सज्ज झालं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी तत्पर असते. कोकणी माणूस शहरात कामाला असला तरी तो कोकणात गणपती उत्सव साजरा करण्यासाठी जातो. चाकरमानी कोकणी माणसाला एसटी बसने मोफत जाता यावं यासाठी राजकीय पक्षांसह विविध संस्थांनी कल्याण एसटी डेपोमधून सुमारे 369 बस गाड्यांचं बुकिंग केलं आहे. कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कल्याण डोंबिवलीतील कोकणवासियांसाठी तब्बल 200 हून अधिक एसटी बसेस बुक केल्या असून या बसमधून प्रवाशांना मोफत प्रवास करण्यात येणार आहे. तर यंदा प्रवाशांनी देखील मोठ्या प्रमाणात आगाऊ बुकिंग केली आहे. अजूनही हे बुकिंग सुरुच असून यंदा एसटी महामंडळला कोट्यवधींचे उत्पन्न अपेक्षित आहे.


निर्बंध नसल्याने यंदाचा गणेशोत्सव धूमधडाक्यात
यंदा गणेशोत्सव देखील निर्बंधमुक्त साजरा होणार असल्याने गणेशेभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या मुंबई आजूबाजूच्या परिसरातील कोकणवासीयांना गणेशोत्सवात कोकणात जाता आलं नव्हतं. यंदा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्यात येणार असल्याने मोठा उत्साह दिसून येत आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव जवळ आला की नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसरात स्थायिक असलेल्या कोकणवासियांची पावले गावाला जाण्यासाठी वळतात.