चेन्नई : तमिळनाडूतील सेलममध्ये फेसबुकमुळे एका २१ वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला आहे. सेलममधील २१ वर्षीय विनुप्रियाचे फोटो काही अज्ञातांनी मॉर्फ्ड करून अश्लील फोटो बनवून फेसबुकवर अपलोड केले होते. याची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवूनही, कोणतीही कारवाई न झाल्याने विनुप्रियाने गळफास लावून आत्महत्या केली.
विनुप्रियाने आपली जीवन यात्रा संपवताना सुसाइड नोट लिहून ठेवली होते. यात तिने फेसबुकवरील अपलोड केलेले अश्लिल फोटो कुणालाही पाठवले नव्हते. मात्र याचा तिच्या आई-वडिलांना विश्वास नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे, म्हटले आहे. तसेच आपल्या पालकांच्या अविश्वासाप्रति तिने खेद व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर विष्णूप्रियाच्या पालकांनी फेसबुकवरील फोटो प्रकरणावर कारवाई करण्यासाठी एका पोलीस आधिकाऱ्याने मोबाईल फोनची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने विनुप्रियाच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या दोन्ही अधिकऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी विष्णूप्रियाने केमिस्ट्रीमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता. विष्णूप्रियाच्याच नावाने काही अज्ञातांनी फेसबुक पेज बनवून तिचे अश्लिल मॉर्फ्ड फोटो अपलोड केले होते. यावर २३ जून रोजी सेलम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून हे फोटो तत्काळ हटवण्याची मागणी केली होती. पण तसे न झाल्याने विष्णूप्रियाने आपली जीवन यात्रा संपवली.
या प्रकरणी पोलिसांनी हे फेसबुक पेज ब्लॉक केले असून विष्णूप्रियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच हे फेसबुक पेज बनवून फोटो अपलोड करणाऱ्यांची माहिती फेसबुक व्यवस्थापनाकडे मागितले असल्याचे सांगण्यात आले.
पण विष्णूप्रियाच्या कुटुंबियांनी कारवाईत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.