कॅलिफोर्निया : व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप कायमच नवनवीन फीचर्स आपल्या यूझर्ससाठी आणत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवरील टेक्स्ट बोल्ड-इटॅलिक करण्याचं फीचर्स अॅड केलं आहे. मात्र, आता एका मोठा बदल व्हॉट्सअॅपमध्ये होणार आहे.

 

व्हॉट्सअॅप म्हटलं की, स्मार्टफोन किंवा आयफोन आलाच. मात्र, व्हॉट्सअॅप मोबाईलसह डेस्कटॉपवर वापरता यावा म्हणून वेब व्हॉट्सअॅपची सुविधा सुरु करण्यात आली. मात्र, इथेही तुम्हाला तुमचा फोन डेस्कटॉपच्या जवळच ठेवावा लागतो. शिवाय, फोनमधील इंटरनेट डेटाही संपतो. मात्र, आता तसे होणार नाही. कारण त्यादृष्टीने बदलासाठी व्हॉट्सअॅप पावलं उचलण्याच्या प्रयत्नात आहे.

 

व्हॉट्सअॅप हे अॅप लवकरच फोनपासून पूर्णपणे वेगळे केले जाणार आहे. म्हणजे व्हॉट्सअॅपचं अॅप यूझर्सना फोनशिवाय विंडोज किंवा मॅक ओएसवर वापरता येईल. आता फोन डेस्कटॉपच्या जवळ असल्याशिवाय आणि फोनमध्ये इंटरनेट किंवा वायफाय सुरु असल्याखेरीज तुम्हाला डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येत नाही.

 

‘फेसबुक’कार मार्क झुकरबर्गच्या व्हॉट्सअॅपचे आजच्या घडीला जगभरात 100 कोटींहून अधिक यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर दिवसाला 42 अब्ज मेसेज आणि 1 अब्ज 60 कोटी फोटो सर्क्युलेट होतात. तर 2 अब्ज 50 कोटी व्हिडीओ सर्क्युलेट होतात. आजच्या घडीला मेसेजिंग अॅपमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिले जाते.