नवी दिल्ली : अॅपच्या माध्यमातून देण्यात येणारी कॉलिंगची सुविधा रोखण्याची मागणी मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांनी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटकडे (DOT) केली आहे.

 

टेलिकॉम सेक्रेटरी जे एस दीपक यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, “मोबाईल नंबरचा वापर करुन इंटरनेटवरुन कॉल करणे, हे मोबाईल आणि लँडलाईनसाठी तयार केलेल्या नियमांच्या विरोधात आहे. इंटरनेटवरुन कॉलिंगमुळे मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल.”

 

टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने इंटरनेट किंवा व्हॉट्सअॅप कॉलिंगविरोधात ठोस पावलं उचलावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानेही अशाच प्रकारची पत्राद्वारे तक्रार केली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये एअरटेल भारती, आयडिया, व्होडाफोनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

 

नेट न्युट्रॅलिटी वादादरम्यान ओटीटी अॅप्स म्हणजेच ओव्हर द टॉप अॅप्सवर बंदी आणण्याची किंवा त्याच्याशी संबंधित नियम बनवण्याची मागणी झाली होती. तेव्हाही एअरटेल कंपनीचं म्हणणं होतं की, अॅप्समुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा नुकसान सहन करावा लागतो.

 

ओव्हर द टॉप अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप आणि स्काईपसारख्या अॅप्सचा समावेश आहे. हे अॅप्स नेटवर्कची सुविधा देणाऱ्या कंपन्याचं प्लॅटफॉर्म वापरतात.

 

त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या या मागणीवर टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि यावरच व्हॉट्सअॅप आणि स्काईपसारख्या अॅप्सचं भवितव्य ठरणार आहे.