मुंबई : शाओमीने नुकतंच 'रेडमी'ला वेगळा ब्रॅण्ड म्हणून घोषित केलं होतं. आता कंपनीने या ब्रॅण्डअंतर्गत पहिला स्मार्टफोन 'रेडमी नोट 7' मागील आठवड्यातच चीनमध्ये लॉन्च केला होता. पण आंतरराष्ट्रीय बाजारात या स्मार्टफोनचं लॉन्चिंगची प्रतीक्षा आहे. त्यातच आता 'रेडमी नोट 7'च्या अपग्रेडेड 'रेडमी नोट 7 प्रो'चीही चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय कंपनी रेडमी गो हा बजेट स्मार्टफोनही लॉन्च करणार आहे. कंपनीचा हा पहिला अँड्रॉईड गो स्मार्टफोन असेल.
'रेडमी नोट 7' च्या लॉन्चिंगवेळी शाओमीने 'रेडमी नोट 7 प्रो' पुढील महिन्यात लॉन्च करणार असल्याची माहिती दिली होती. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर असू शकतो, अशीही चर्चा रंगली आहे. तसंच या स्मार्टफोनची किंमतही लीक झाली आहे.
'रेडमी नोट 7' प्रमाणेच 'रेडमी नोट 7 प्रो'मध्येही 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असेल. मागील आठवड्यात 'रेडमी नोट 7'ची माहिती देताना Weibo या वेबसाईटवर रेडमी बाय शाओमीने एक टीझर पोस्ट केला होता. 'रेडमी नोट 7 प्रो'मध्ये सोनी आएमएक्स586 प्रायमरी सेंसरसह 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा असेल, असं टीझरमध्ये सांगितलं होतं. तर 'रेडमी नोट 7' मध्ये 48 मेगापिक्सेल सॅमसंग आयएमओसीईएलएल जीएम1 सेंसर आहे.
भारतातील स्मार्टफोनच्या किंमती
'रेडमी नोट 7 प्रो' पुढील महिन्यात चिनी नववर्षाच्या सुमारास लॉन्च होऊ शकतो, असा शाओमीने सांगितलं आहे. पुढील महिन्यात हा फोन दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोअरेज असू शकतं. 'रेडमी नोट 7 प्रो'ची किंमत 1499 युआन म्हणजे सुमारे 15,800 रुपये असेल. तर 'रेडमी गो'ची किंमत 5 हजार रुपयांनी कमी असण्याची शक्यता आहे.
तर शाओमी 'रेडमी नोट 7' हा स्मार्ट स्टोअरेजच्या आधारावर तीन व्हेरियंटमध्ये (3GB+32GB, 4GB+64GB आणि 6GB+64GB) लॉन्च केला होता. या तिन्ही व्हेरियंटयची किंमत 999 युआन म्हणजेच सुमारे 10,500 रुपये, 1199 युआन म्हणेजच सुमारे 12,600 रुपये आणि 1399 युआन म्हणजेच जवळपास 14, 700 रुपये आहे.