शाओमीच्या ‘MI मॅक्स’चा दुसरा लूक रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2016 04:35 AM (IST)
नवी दिल्ली : शाओमी कंपनीने आपला आगामी स्मार्टफोन ‘MI मॅक्स’चा अजून एक फोटो प्रसिद्ध केला आहे. काही दिवसांपूर्वीच या फोनचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंर आता या स्मार्टफोनचा दुसरा फोटोही रिलीज करण्यात आला आहे. दुसऱ्या फोटोची स्मार्टफोनप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता होती. दुसऱ्या फोटोमध्ये मेटल बॉडी असणाऱ्या या फोनचा लूक आकर्षक दिसत आहे. शाओमीचे सीईओ जून ली यांनी चीनमधील एका सोशल साईटवरुन हा फोटो शेअर केला आहे. मेटल बॉडी असलेल्या या फोनचा हा लूक स्मार्टफोन प्रेमींची उत्सुकता वाढवणारा आहे. यापूर्वीच्या फोटोमध्ये MI मॅक्स एका जीन्सच्या खिशात दाखवण्यात आला होता. त्यामुळं तो कसा असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. ‘MI मॅक्स’चे जबरदस्त फिचर्स: एका वेबसाईटच्या माहितीनुसार, MI मॅक्समध्ये 6.44 इंचचा डिस्प्ले असणार आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. तर 1.4 गीगाहर्ट्झ हेक्झा कोर 650 स्नॅपड्रॅगनचं प्रोसेसर असणार आहे. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये असेल, त्यापैकी एक 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी, असा असेल. ‘MI मॅक्स’मध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल, तर 5 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर असणार आहे, तर जबरदस्त क्षमता असणारी नॉन रिमोव्हेबल बॅटरी असणार आहे. शाओमी 2 जीबी रॅम असणाऱ्या फोनची किंमत जवळपास १३ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. कंपनी येत्या काही दिवसांतच म्हणजेच 10 मे लाच फोन लाँच करु शकते, अशीही माहिती आहे.