ओस्लो (नॉर्वे) : जगभरात इंटरनेट स्पीडची चाचणी करणारी एजन्सी ओक्लाच्या मते, जगात सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेटचा स्पीड नॉर्वे या देशात आहे. गेल्या 13 महिन्यात मोबाइल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत नॉर्वे 11व्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांकावर आलं आहे.


ओक्लानं इंटरनेटच्या स्पीड तपासणीसाठी 'स्पीडटेस्ट डॉट नेट' हे अॅप तयार केलं आहे. ज्याच्या मदतीनं यूजर्स कधीही आपलं इंटरनेट स्पीड तपासू शकतात.

स्पीडटेस्ट डॉट नेटमधून मिळालेल्या आकड्यांनुसार, नॉर्वेमध्ये मागील वर्षभरात मोबाईल इंटरनेटच्या सरासरी स्पीडमध्ये 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या याचा वेग 52.6 मेगाबाइट प्रति सेकंद आहे.

नॉर्वेतील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी 'टेलिनॉर'नं मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवला होता. नॉर्वेमध्ये टेलिनॉरसह तीन कंपन्यांनी आपलं मोबाईल नेटवर्क सुरु केलं आहे.

टेलिया आणि आइस डॉट नेट या दोन दूरसंचार कंपन्यानी आपलं 4जी नेटवर्क आणखी वेगवान करण्यासाठी बरीच गुंतवणूक केली आहे. मागील महिन्यात टेलीनॉर नेटवर्कवर सरासरी डाऊनलोड स्पीड 58.6 मेगाबाइट प्रति सेकंद होता. तर टेलिया नेटवर्कवर 45.9 मेगाबाइट प्रति सेकंद आहे.

ओक्लाच्या चाचणीनुसार जगात सर्वात वेगवान मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये नेदरलॅण्ड दुसऱ्या तर हंगेरी तिसऱ्या स्थानावर आहे.

(नोट : हा सर्वे ओक्ला या इंटरनेट स्पीड चाचणी करणाऱ्या एजन्सीनं केला आहे.)