मुंबई : सध्या मोबाईल सर्वांच्याच गरजेची वस्तू झाली आहे. त्यातच बॅटरी डिस्चार्ज होणं, हे यूझर्ससाठी सर्वात मोठं काळजीचं कारण असतं. मात्र आता यावरही तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
एक वेळ जेवण मिळालं नाही तर चालेलं, पण मोबाईल नसेल तर आजची तरुणाई अस्वस्थ होते. त्यातच मोबाईलमधल्या वेगवेगळ्या अॅप्समुळे बॅटरी लगेच उतरणं, ही मोठी डोकेदुखी ठरली आहे. मोबाईल चार्जर, पॉवर बॅँक बॅटरी किंवा डेटा कॉडच्या पलिकडे जाऊन यावरही, भन्नाट उपाय निघाला आहे. कोणतीही वायर न जोडता आपल्याला मोबाईल चार्ज करता येणार आहे.
आपला विश्वास बसणार नाही, अशी किमया अमेरिकेच्या यांक टेक्नॉलॉजीज कंपनीनं साधली आहे. सुरुवातीला हा वायरलेस चार्जर आयफोन, सॅमसंग, एलजी, एचटीसी आणि गुगलच्या फोनला सपोर्ट करेल.
या वायरलेस चार्जरचा मदरबॉक्स युसबी वायरनं चार्ज होणार असून त्यावर 4 मोबाईल रिचार्ज करता येतील. यांक टेक्नॉलॉजीजच्या 4 अभियंत्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. विशेष म्हणजे या चौघांमध्ये हर्षल अग्रवाल या भारतीय वंशाच्या अभियंत्याचाही समावेश आहे.
आज तुम्ही हा चार्जर बुक केला तर सप्टेंबरपर्यंत तो तुम्हाला 79 डॉलर्स म्हणजे जवळपास 4 हजारात मिळू शकतो. त्यामुळे आपला मोबाईल कायम फुल चार्ज ठेवण्यासाठी, तुम्ही हा वायरलेस चार्जर घेण्यास काहीच हरकत नाही.