मुंबई : रिलायन्स जिओने प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांना हादरे दिले आहेत. जिओच्या आगमानानंतर गेल्या तीन-चार महिन्यात अनेक कंपन्यांनी आपले व्हॉईस कॉलिंग आणि डेटा प्लॅन नव्याने तयार केले आणि त्यात नवनव्या ऑफर्स जाहीर केल्या. याच ‘जिओ इफेक्ट’चा एक भाग म्हणजे एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने देशभरात रोमिंग फ्रीची घोषणा केली आहे. एप्रिलपासून या घोषणेची एअरटेलकडून अंमलबजावणी केली जाईल.
27 कोटी ग्राहकांना फायदा
एअरटेलचे देशभरात 27 कोटी ग्राहक आहेत. या ग्राहकांनी देशभरात कुठेही रोमिंग चार्जेस द्यावे लागणार नाहीत. विशेष म्हणजे, ज्याप्रकारे व्हॉईस कॉलवर रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत, त्याच प्रकारे डेटा वापरावरही रोमिंग चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांसाठी नक्कीच खुशखबर आहे.
इनकमिंग कॉल आणि एसएमएसवरही सूट
एअरटेलचे ग्राहक देशभारत कुठेही असले, तरी इनकमिंग कॉल आणि एमएमसही मोफत असेल. जिओच्या देशभरातील मोफत कॉलच्या ऑफरचा परिणाम म्हणून एअरटेलच्या या घोषणेकडे टेलिकॉम क्षेत्रात पाहिलं जातं आहे.
जिओचा धसका
व्होडाफोननेही याआधी इनकमिंग कॉवर रोमिंग चार्जेस आकारणं बंद केलं आहे. भारतातून परदेशात गेल्यावरही एअरटेलच्या कॉलवर सवलत मिळणार आहे. एकंदरीत एअरटेलने जिओचा जबरदस्त धसका घेतल आहे. देशातील प्रस्थापित टेलिकॉम कंपन्यांनी रिलायन्स जिओच्या नव्या घोषणांना थोडं जास्तीच मनावर घेतल्याचं दिसून येतंय.
एअरटेलच्या सीईओंनी काय सांगितले?
एअरटेलचे एमडी आणि सीईओ गोपाल विठ्ठल यांच्या माहितीनुसार, नॅशनल रोमिंग चार्जेस बंद केल्यानंतर आता देश एक ‘लोकल नेटवर्क’ बनणार आहे. म्हणजेच देशभरात कुठूनही कुठेही कॉल केल्यास लोकल चार्जेसनुसारच पैसे आकारले जातील. डेटाबाबतही हीच ऑफर लागू असेल.
इंटरनॅशनल रोमिंगबाबत एअरटेलची ऑफर काय?
इंटरनॅशनल रोमिंगबाबत एअरटेलचं म्हणणं आहे की, एप्रिलपासून परदेश प्रवासादरम्यान मोबाईल बिलाची कसलीही काळजी करण्याची गरज भासणार नाही. कंपनीने याआधीच 1 दिवस, 10 दिवस आणि 30 दिवसाचे पॅक लॉन्च केले आहेत. आता नव्या ऑफरनुसार, परदेशात असताना ग्राहकचा जर 1 दिवसाचा पॅक संपला, तर आणखी 1 दिवसाचा पॅक आपोआप त्यात समाविष्ट केला जाईळ. जेणेकरुन ग्राहकाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सध्या काय होतं की, परदेश प्रवासासाठी रिचार्ज केलेला पॅक संपल्यानंतर अधिकच्या वापरावर रोमिंग चार्जेस लावले जायचे. या अधिकच्या चार्जेसची आता ग्रहाकांना चिंता करण्याची गरज नाही.