नवी दिल्ली : 1 एप्रिल म्हणजे नव्या आर्थिक वर्षासोबतच देशात नवा अर्थसंकल्प लागू झाला. या अर्थसंकल्पात परदेशात मोबाईल निर्मिती तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण, मोबाईलवर लागणारी कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच मोबाईलचे पार्ट्स महागणार आहेत. ही कस्टम ड्युटी 15 टक्क्यांहून 20 टक्के केली आहे.


मोबाईल फोनसोबतच अॅक्सेसरिजही महागणार आहेत. यावरील कस्टम ड्युटी 7.5-10 टक्क्यांहून 15 टक्के करण्यात आली. विशेषतः अॅपलसारख्या कंपन्यांसाठी हा मोठा झटका आहे. कस्टम ड्युटी वाढल्यामुळे भारताबाहेर निर्मिती होणारे फोन आणि अॅक्सेसरिजच्या किंमती महागणार आहेत.

'मेक इन इंडिया'च्या दृष्टीने हे पाऊल फायदेशीर ठरू शकतं. कारण, भारतातील उत्पादकांना यामुळे फायदा होईल. भारतातील उत्पादक कंपन्या मायक्रोमॅक्स, इंटेक्स यांचे स्मार्टफोन स्वस्त होतील, तर अॅपल, सॅमसंग, ओप्पो यांसारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन महागतील.

स्मार्टफोनच नव्हे, तर सर्व इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आणि डिव्हाईसवर कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे सोनी, सॅमसंग आणि मोठ्या कंपन्यांची उत्पादनं आता महागतील. दरम्यान, आयफोन एसईच्या किंमतीत कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. कारण, हा फोन भारतातच असेंबल केला जातो.