व्हॉट्सअपवरुन या वर्षाअखेरपर्यंत पैसेही पाठवता येणार!
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2017 08:22 AM (IST)
मुंबई : व्हॉट्सअपवर तुम्ही केवळ चॅटिंगच नव्हे, तर आता तुमच्या मित्रांना पैसेही पाठवू शकणार आहात. कारण व्हॉट्सअप या वर्षाअखेरपर्यंत यूपीआय म्हणजेच 'यूनिफाईड पेमेंट इंटरफेस' सेवा सुरु करणार आहे. गॅजेट 360 च्या वृत्तानुसार, व्हॉट्सअप सध्या बँका आणि एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी यूपीआय सपोर्टसाठी चर्चा करत आहे. चर्चा सकारात्मक दिशेने होत असून काही ठराविक मुद्द्यांवर चर्चा अडकल्याने उशीर होत असल्याची माहिती आहे. हाईक आणि WeChat मेसेंजरवर अगोदरपासूनच यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरु आहे. पण भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअपने ही सेवा अद्याप दिलेली नाही. त्यामुळे युझर्स या सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी केली. त्यानंतर कॅशलेस पेमेंटला चालना देण्यासाठी सर्वच स्तरांवरुन प्रयत्न केले जात आहेत. ई-वॉलेट कंपन्यांनी या संधीचा फायदा घेत ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स आणि सेवा दिल्या आहेत.