मुंबई : स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक यूझरसाठी व्हॉट्सअॅप म्हणजे जीव की प्राण झाला आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो काढून मित्र-नातेवाईकांना पाठवण्याच्या बेतात असलेल्या नेटकऱ्यांना 'व्हॉट्सअॅप'ने मात्र ऐनवेळी दगा दिला. नववर्षाच्या ठोक्यालाच देशभरात व्हॉट्सअॅप जवळपास अर्धातास बंद पडलं होतं.


काल रात्री 12 वाजल्यानंतर अनेक जण आपल्या प्रियजनांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवण्याच्या तयारीत होते. काही जणांनी मेसेज ब्रॉडकास्ट केले, तर काहींनी फॉरवर्ड, कोण व्हिडिओ कॉलच्या तयारीत होतं तर कोण ग्रुपवर मेसेज पोस्ट करत होतं. मात्र त्याचवेळी व्हॉट्सअॅप हँग झालं.

एकाच वेळी अनेक जण इंटरनेट वापरत असल्यामुळे नेटवर्क जॅम झालं असावं, असा काही जणांचा आधी समज झाला. फोन रिस्टार्ट करण्यात आले, तसंच वायफायही ऑन-ऑफ करुन पाहिलं गेलं. तरीही काही उपयोग होईना. मित्राचंही व्हॉट्सअॅप चालत नसल्याचं पाहून काही जणांना शंका आली.

त्यानंतर फेसबुक-ट्विटरवर व्हॉट्सअॅप बंद झाल्याच्या पोस्ट दिसू लागल्या आणि सर्वांना उलगडा झाला. सुमारे 30 मिनिटांनंतर रात्री एकच्या सुमारास व्हॉट्सअॅप पुन्हा सुरु झालं. इतका वेळ साचून राहिलेले मेसेज धडाधड डिलीव्हर झाले. तसंच प्रतीक्षेत असलेले शुभेच्छांचे मेसेज येऊन धडकल्याने फोन सतत किणकिणू लागला.

नववर्षाच्या स्वागतादिवशीच व्हॉट्सअॅप बंद पडण्याची घटना इतिहासात दुसऱ्यांदा घडली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे 1 जानेवारी 2016 रोजी व्हॉट्सअॅप बंद पडले होते. गेल्या वर्षातही सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात अशाचप्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झालं होतं.