न्यूयॉर्क : व्हॉट्सअॅपची बहुप्रतीक्षित व्हिडिओ कॉलिंग सेवा अखेर सुरु झाली आहे. अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोज फोन यूझर्स आता व्हॉट्सअॅपधारकांना व्हिडिओ कॉल करु शकतील. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरुन याबाबत मार्क झुकरबर्गने घोषणा केली.

'व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सुरु करण्याबाबत यूझर्सकडून गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला वारंवार विनंती केली जात होती. त्यामुळे हे फीचर जगासमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.' असं व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगवर म्हटलं आहे. वायफायवरुन तुम्ही मोफत व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा तुमच्या मोबाईल कंपनीच्या डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होईल.

व्हिडिओ कॉलिंग सुरु होण्यासाठी यूझर्सना व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. 2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप 19 बिलियन डॉलरला विकत घेतलं होतं. सध्या भारतात 15 कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर सध्या पर्सनल मेसेजिंग, ग्रुप चॅट, व्हॉईस कॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

फेसबुकने यापूर्वीच व्हिडिओ कॉलिंग सेवा लाँच केली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचं मार्केट भारतात जलद गतीने वाढत आहे. फक्त महागडे फोन वापरणारेच नाही, तर प्रत्येकापर्यंत ही सेवा पोहचवण्याचा आपला मानस असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे. आतापर्यंत स्काईप, फेसबुक, गुगल ड्युओ, व्हायबर यासारख्या काही सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हिडिओ कॉलिंग उपलब्ध आहे.

व्हिडिओ कॉलिंग कसे कराल?

1. ज्या व्यक्तीला फोन करायचा आहे, त्याचा चॅट ओपन करा.
2. ऑप्शन्समध्ये 'फोन' आयकॉनवर क्लिक करा
3. व्हॉईस आणि व्हिडिओ यापैकी व्हिडिओ पर्याय निवडा