मुंबई : सर्वाधिक प्रसिद्ध मेसेंजर अॅप असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युझर्सला नवनवीन अपडेट देत असतं. सध्यस्थितीत व्हॉट्सअॅप आणखी काही मोठे बदल करण्याच्या विचारात आहे.


यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे  व्हॉट्सअॅपवर   लवकरच Boomerang सारखं फीचर वापरकर्त्यांना मिळण्याची शक्यता आहे. सध्या इंस्टाग्रामवर  Boomerang नावाचं व्हिडीओ प्रस्तुतीचं फीचर दिलं गेलं आहे. या फीचरचा वापर वेगवेगळे शॉर्ट व्हिडीओ बनविण्यासाठी केला जातो.

माहितीनुसार व्हॉट्सअॅपवर या नव्या फीचरचे अपडेट लवकरच येऊ शकतात. Boomerang फीचर Gif फाईलमध्ये व्हिडीओ बनवण्याच्या पर्यायासह येण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपवर Boomerang साठी 7 सेकंदाची मर्यादा असू शकते.

मल्टिपल अकाउंट फीचर

यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या एका अकाऊंटवरून अनेक स्मार्टफोनमध्ये वापरासंदर्भातील अपडेट येणार असल्याची देखील माहिती मिळाली होती. यामुळे वापरकर्त्याला एका नंबरवरूनच दोन किंवा अधिक स्मार्टफोनवर WhatsApp चालवता येणार आहे. एवढंच नाही तर व्हॉट्सअॅपची चॅट हिश्ट्री देखील या दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्ट होणार आहे. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनमध्ये काहीही परिणाम होणार नसल्याचे देखील स्पष्ट आहे.

वेब  व्हॉट्सअॅपसाठी मोबाईल इंटरनेटची गरज नसणार

व्हॉट्सअॅपमध्ये सर्वात महत्वाचा असा आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जनसाठी हा बदल आहे. भविष्यात व्हॉट्सअॅपला वेब ब्राऊझरवर चालवायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची गरज नसणार आहे. मात्र हे बदल कधी होतील, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.