मुंबई : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवाद साधणं सोपं झालं असलं तरी त्याच माध्यमातून आता अफवांचं पिक मोठ्या प्रमाणात पसरवलं जात आहे. सध्या व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड व्हर्जनबाबतही असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

व्हॉट्सअॅप गोल्ड नावाच्या व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जन बद्दल सध्या एक मेसेज शेअर केला जात आहे. तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅपचे व्हर्जन अपडेट करणे गरजेचे आहे, असे या मेसेजमध्ये लिहीले आहे. तसेच व्हॉट्सअॅप गोल्ड डाउनलोड करण्यासाठी एक लिंक देखील या मेसेजमध्ये दिलेली आहे. परंतू व्हॉट्सअॅपचे अशा प्रकारचे कुठलेही अपडेट  नसून हा एखादा व्हायरस असण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या लिंकवर क्लिक केल्याने आपले मेसेजेस, मोबाईल मधील इतर महत्त्वाची माहिती चोरी होऊ शकते.

यापुर्वी देखील व्हॉट्सअॅप गोल्ड बाबतचा मेसेज व्हायरल झाला होता.  नव्या फिचर्ससह व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट असल्याचे समजून अनेक जण या लिंकवर क्लिक करतात. परंतू असे कोणतेही अपडेट व्हॉट्सअॅप कडून जारी करण्यात आलेले नाही.  व्हॉट्सअॅपचे अधिकृत अपडेट्स प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअर वर मिळत असतात. अशा प्रकारे एखाद्या लिंकद्वारे मिळणारे अपडेट्स व्हायरस असू शकतात.