मुंबई : सध्या तुमच्या-आमच्यापैकी अनेकांचं संभाषण व्हॉट्सअॅपवरच जास्त होतं. शाळा-कॉलेजमधील मित्रांपासून प्रियकर-प्रेयसीचे 'प्रेमळ' संवाद असो किंवा जवळच्या व्यक्तींसोबत शेअर केलेली पासवर्ड, आर्थिक व्यवहारांची गोपनीय माहिती. मात्र व्हॉट्सअॅपवरील हीच माहिती कोणतीही व्यक्ती सहज हॅक करु शकते, याची उदाहरणं समोर येत आहेत.


मुंबई सायबर पोलिसांनी व्हॉट्सअॅप युझर्सना सावधानतेचा इशारा दिल्याचं 'मि़ड-डे'च्या एका वृत्तात म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यात व्हॉट्सअॅपवरील गोपनीय व्हिडिओ, फोटो आणि फाईल्स हॅक करुन त्यांचा गैरवापर झाल्याच्या 50 हून जास्त तक्रारी आल्या आहेत.

सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोडचा अॅक्सेस मिळवून व्हॉट्सअॅप अकाऊण्ट सहजरित्या हॅक करता येतं, असा दावा सायबर पोलिसांनी केला आहे.

कसं होतं हॅकिंग?

1. व्हॉट्सअॅप सेटिंग्जमध्ये 'चेंज माय नंबर' ऑप्शन सिलेक्ट करुन हॅकर स्वतःच्या नंबर ऐवजी पीडिताचा नंबर फीड करतो.
2. यावेळी व्हॉट्सअॅप सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मूळ व्यक्ती म्हणजेच पीडिताला पाठवतो.
3. हॅकर एखादी कहाणी रचून तो व्हेरिफिकेशन कोड शेअर करण्यास सांगतो.
4. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड शेअर करताच पीडिताचा सर्व डेटा क्षणात हॅकरला उपलब्ध होतो.

हॅकर रिस्टोअर या ऑप्शनचा वापर करुन पीडिताचे कॉन्टॅक्ट्स, फोटोज, व्हिडिओ स्वतःच्या फोनवर रिस्टोअर करतो. हा डेटा पीडिताला ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी वापरला जातो, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

हॅकर इतक्यावरच न थांबता कॉन्टॅक्ट लिस्टमधील इतरांशी 'पीडिता'चा चेहरा होऊन संपर्क साधतो. अशाचप्रकारे पुढील व्यक्तींना टार्गेट करुन त्यांचाही सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागितला जातो आणि ही साखळी अशीच सुरु राहते.

एका हॅकरना मॉडेलला इव्हेंट मॅनेजर असल्याचं सांगून संपर्क साधला. काम देण्याच्या बहाण्याने तिच्याकडे सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागण्यात आला. पीडितेला त्याचं गांभीर्य न समजल्याने तिने तो शेअर केला आणि क्षणात तिचे वैयक्तिक फोटो हॅकरला मिळाले. काहीवेळा एनजीओ कार्यकर्ते असल्याचं सांगत सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड मागितले जातात, असंही पोलिसांनी सांगितलं.

हॅक झाल्यास काय कराल?

1. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.

2. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका

3. अनोळखी व्यक्तींशी चॅट करणं टाळा

4. फोनवर अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा