मुंबई : ट्विटर आणि फेसबुकप्रमाणेच आता तुमचं अकाऊंट व्हॉट्सअॅपवरही व्हेरिफाईड करता येणार आहे. व्हॉट्सअॅप बिझनेससाठी भारतात नवीन अॅप लाँच करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मोठ्या संस्था आणि कंपन्या आता व्हेरिफाईड अकाऊंटच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधू शकतात.


ग्राहकांना कंपन्यांशी किंवा संस्थांशी थेट संवाद साधता येईल. यासाठी एक पिवळा चॅटबॉक्स देण्यात येणार आहे. हा चॅटबॉक्स डिलीट करता येणार नाही. मात्र एखाद्या कंपनीशी तुम्हाला बोलायचं नसेल, तर ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.

भारतात व्हॉट्सअॅपने या फीचरची टेस्टिंग सुरु केल्याचं वृत्त 'फॅक्टर डेली'ने दिलं आहे. कथित स्वरुपात ही सेवा बुक माय शोद्वारे करण्यात आली असून बुक माय शोने ग्राहकांना तिकिट बुकिंग कंफर्मेशनही पाठवलं आहे. एका युझरने याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे.



तुम्हाला कंपनीकडून मेसेज पाहिजे असतील तर कंफर्मेशन करता येईल. मात्र मेसेज नको असतील तर STOP लिहून पाठवावं लागेल. दरम्यान बुक माय शोशिवाय व्हॉट्सअॅपने कॅब कंपनी ओला आणि हॉटेल कंपनी ओयोसोबतही याबाबत टाएप केल्याचं वृत्त आहे. येत्या काळात ओलाचा ओटीपीही तुम्हाला व्हॉट्सअॅपवरच येण्याची शक्यता आहे.