मुंबई : व्हॉट्सअॅप वापरताना एखाद्या ग्रुपवर किंवा पर्सनल चॅटवर चुकून मेसेज सेंड झाल्याचा अनुभव तुम्हाला अनेकदा आला असेल. मात्र व्हॉट्सअॅपने अखेर ते फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या कित्येक दिवसांपासून युझर्सना होती.


व्हॉट्सअॅप लवकरच रिकॉल फीचरची अपडेट जारी करणार आहे. यामुळे तुम्हाला सेंड झालेला मेसेज अनसेंड करता येईल. ‘व्हॉट्सअॅप बीटा इन्फो’च्या वृत्तानुसार लवकरच 'आयओएस'साठी हे फीचर दिलं जाणार आहे. ज्यामुळे युझर्स सेंड झालेले मेसेजही डिलीट करु शकतील.

या फीचरमुळे डिलीट होण्यासोबत मेसेज नोटिफिकेशन सेंटरमधूनही गायब होतील. हे फीचर येणार असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं आहे. मात्र आता अनसेंड नावाने हे फीचर येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.

व्हॉट्सअॅप सध्या या फीचरवर काम करत असून पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. लवकरच हे फीचर युझर्ससाठीही जारी केलं जाईल, असं 'व्हॉट्सअॅप बीटा इन्फो'ने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅप बीटा इन्फो हे व्हॉट्सअॅपचं अधिकृत ट्विटर हँडल नाही. मात्र या ट्विटर हँडलद्वारे व्हॉट्सअॅप फीचर्सबाबत लीक रिपोर्ट दिले जातात.

‘इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅपचं अनसेंड फीचर केवळ पाच मिनिटांसाठी असेल. म्हणजे तुम्ही मेसेज सेंड करुन पाच मिनिट पूर्ण झाले असतील तर तुम्हाला तो मेसेज डिलीट करता येणार नाही. हे फीचर फोटो आणि GIF साठीही काम करणार आहे.