मुंबई : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं तुम्हाला आता महागात पडू शकतं. कारण ग्रुपमध्ये पोस्ट कोण टाकणार ते ठरवण्याचा अधिकार व्हॉट्सअॅपने अॅडमिनला दिला आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ, जीआयएफ आणि व्हॉईस मेसेज कुणी पाठवायचा, याचा निर्णय अॅडमिन घेईल.


WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या 2.17.430 या व्हर्जनमध्ये ही नवी अपडेट देण्यात आली आहे. "Restricted Groups" असं या नव्या सेटिंगचं नाव असेल, असंही बोललं जात आहे.

अॅडमिनने तुम्हाला मेसेज करण्यासाठी बंदी घातली तर तुम्ही ग्रुपमधील मेसेज फक्त वाचू शकता. त्याला रिप्लाय देता येणार नाही. बंदी घातलेल्या ग्रुपमधील सदस्याला 'मेसेज अॅडमिन' या ऑप्शनवर क्लिक करुन मेसेज करावा लागेल. मात्र तो अॅडमिनने स्वीकारणं गरजेचं आहे.

ग्रुप अॅडमिनला व्हॉट्सअॅप आणखी अधिकार देणार, असं वृत्त ऑक्टोबरमध्ये समोर आलं होतं. ग्रुपमधील कोणते सदस्य ग्रुपचं नाव आणि आयकॉन बदलू शकतात, हे आता ग्रुप तयार केलेला अॅडमिन ठरवू शकेल, असं त्यावेळी समोर आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.