नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचंही प्रमाण मोठं आहे. सतत समोर दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीचं अल्पवयीन मुलं लगेच अनुकरण करतात. हीच गोष्ट लक्षात घेत फेसबुकने अमेरिकेत १८ वर्षाखालील मुलांना फेसबुकवरील हत्यारांच्या साहित्यांच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.


अमेरिकेत गेल्या काही काळात गोळीबारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर गोळीबाराच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्यास अमेरिकेत सुरुवात करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर मॅगजीनसह हत्यारांच्या जाहिराती, खरेदीवर बंदी आहे. मात्र आता बंदूक ठेवण्याचा बेल्ट, बंदुकीवर लावण्यात येणारी फ्लॅशलाईट आणि बंदुकीचं कव्हर यासंबधीच्या जाहिरातींना १८ वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.


फेसबुकने हत्यारं आणि बंदुकीच्या मॅगजीनसारख्या साहित्यांसंबधीच्या जाहिरातींवर आधीच बंदी घातली आहे. मात्र आता एक पाऊल पुढे जात हत्यांरांच्या सजावटीच्या साहित्यांच्या जाहिरातींवरही वयाची मर्यादा घातल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. येत्या २१ जूनला यासंबधीची जाहिरात पॉलिसी फेसबुककडून जारी करण्यात येणार आहे. फेसबुकच्या पावलावर पाऊल टाकत इतर सोशल नेटवर्किंग साईट्सही हत्यारांची विक्री आणि जाहिरातींसंबधी निर्णय घेतील का? हे पाहावं लागेल.


यूट्यूबने याआधी हत्यारं आणि हत्यारांच्या साहित्यांची विक्री करणाऱ्या वेबसाईट्सच्या लिंकची जाहिरात करणाऱ्या व्हिडीओवर बंदी घालणार असल्याचं म्हटलं होतं.


औरंगाबाद दंगलीत हत्यारांची ऑनलाईन खरेदी
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उसळलेल्या दंगलीत चौघांच्या टोळीनं फ्लिपकार्टवरुन चक्क तलवारी मागवल्या होत्या.तब्बल 12 तलवारी, 13 चाकू, एक गुप्ती आणि कुकरी अशा शस्त्रांची ऑनलाईन खरेदी या टोळीनं केली होती. खेळण्यांच्या नावावर थेट अमृतसरहून ही शस्त्रे मागवण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली होती. त्यामुळे दंगलीत वापरण्यासाठी या हत्यारांची खरेदी केल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. त्यामुळे ऑनलाईन साईट्सवर अशा प्रकारच्या हत्यारांची विक्री किंवा जाहिरात धोक्याची घंटा असल्याचं समोर आलं आहे.


संबंधित व्हिडीओ