नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये 'डेटा टेरिफ वॉर' सुरु झालं आहे. व्होडाफोन इंडियानेही आता आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॅन लॉन्च केले होते आणि कंपनीने 4G डेटा प्लॅनच्या किंमतीत कपात केली आहे. या नव्या किंमतीतील डेटा प्लॅन सध्या पोस्टपेड ग्राहकांसाठीच व्होडाफोनने उपलब्ध करुन दिले आहेत.


व्होडाफोनच्या 4G/3G डेटा प्लॅनच्या नव्या किंमती :

  • 2 जीबी – 350 रुपये (जुनी किंमत - 450 रुपये)

  • 3 जीबी – 450 रुपये (जुनी किंमत – 650 रुपये)

  • 6 जीबी – 750 रुपये

  • 7 जीबी – 850 रुपये

  • 10 जीबी – 999 रुपये

  • 15 जीबी – 1499 रुपये

  • 20 जीबी – 1,999 रुपये


व्होडाफोन इंडियाचे कमर्शियल डायरेक्टर संदीप कटारिया यांनी सांगितले की, “भारतात एक मोठं स्पेक्ट्रम आहे आणि आम्ही या भारतातील टेलिकॉम मार्केटमध्ये नवे नाही आहोत. आमचे केवळ 50 किंवा 1 कोटी सबस्क्राईबर्स नाहीत. आमचे 20 कोटी सबस्क्राईबर्स आहेत, या सर्वांकडे लक्ष द्यावं लागतं.”

काही दिवसांपूर्वी रिलायन्सने जिओ सिम लॉन्च करुन टेलिकॉम कंपन्यांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे आता इतर टेलिकॉम कंपन्याही आपापले डेटा प्लॅनच्या किंमती कमी करु लागल्या आहेत.