मुंबई : मोबाईल वापरणाऱ्यांना ‘स्क्रीन स्क्रॅच’च्या समस्येला कायमच तोंड द्यावा लागतो. यासंबंधी एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. मोबाईल वापरणाऱ्या 65 टक्के लोकांच्या फोन स्क्रीनला स्क्रॅच असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून उघड झाली आहे.
विशेष म्हणजे मोबाईल स्क्रीन तुटण्याच्या प्रकारात भारत पहिल्या स्थानावर आहे. गॅझेट आणि स्क्रीनच्या सुरक्षेवर काम करणारी कंपनी ‘ऑनसाईटगो’च्या एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.
‘ऑनसाईटगो’च्या सर्वेक्षणानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांचे फोन हातातून पडण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेक यूझर्सचे फोन प्रवासादरम्यान पडून खराब होतात.
याच सर्वेक्षणानुसार, 15 टक्के लोक तुटलेल्या स्क्रीनचे फोन वापरतात. ‘ऑनसाईटगो’ने 4 हजारहून अधिक स्मार्टफोन यूझर्सचं सर्वेक्षण केलं आहे.
ऑनसाईटगो कंपनीचे सीईओ कुणाल महिपाल यांच्या माहितीनुसार, गोरिल्ला ग्लास आणि टॅम्पर्ड ग्लास स्क्रीन मोबाईल सुरक्षित ठेवतो. मात्र, संपूर्ण सुरक्षेची हमी या ग्लासही देऊ शकत नाहीत.