मुंबई : व्होडाफोनने दोन नव्या प्लॅनची घोषणा केली आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. रिलायन्स जिओने ‘हॅप्पी न्यू ईयर 2018 प्लॅन’ची घोषणा केल्यानंतर लगेच व्होडाफोनने हे प्लॅन आणत जोरदार टक्कर दिली आहे.


व्होडाफोनच्या नव्या प्लॅनमध्ये पहिला प्लॅन 198 चा आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. व्होडाफोनच्या केवळ प्रीपेड ग्राहकांनाच या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.

198 शिवाय व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी 229 चा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्येही 198 च्या प्लॅनप्रमाणेच सुविधा मिळतील, मात्र 1GB डेटाऐवजी दररोज 2GB डेटाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजेच महिन्याला ग्राहकांना 56GB डेटा मिळणार आहे.

दरम्यान, एअरटेलनेही 199 चा प्लॅन आणला आहे. ज्यामध्ये 28 दिवसांसाठी दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 मेसेज आणि दररोज 1GB 4G/3G डेटा मिळणार आहे. जिओच्या प्लॅननंतर सर्व कंपन्यांनी प्लॅनची घोषणा केली.

जिओचा हॅप्पी न्यू ईयर 2018 प्लॅन

रिलायन्स जिओ नव्या वर्षीत ग्राहकांना गिफ्ट देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 ची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने दोन नवे प्लॅन आणले आहेत.

हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.

199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.

यापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.

(नोट : रिचार्ज करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवर जाऊन हा प्लॅन तुमच्यासाठी आहे का, याची खात्री करुन घ्या)