मुंबई : टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर हटके ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. कुणाला हटके शुभेच्छा, कुणाची टर उडवण्यासाठी तर कुणाला मदत करण्याबाबत सेहवागचे ट्विट प्रसिद्ध आहेत.


त्यामुळेच सेहवागचे लाखो फॉलोअर्स त्याचे ट्विट रिट्विट आणि लाईक्स करतात. मात्र याच ट्विटरने सेहवागला बक्कळ कमाईही करुन दिली आहे.

'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने ट्विटरवरील कमाईबाबत सांगितलं. ट्विटरवर अॅक्टिव्ह असल्यामुळे गेल्या सहा महिन्यात मी 30 लाख रुपये कमावले आहेत, असं सेहवागने म्हटलं आहे.

क्रिकेट असो वा ट्विटर सेहवागने दोन्ही मैदानं गाजवली आहेत. त्यामुळेच सेहवागचे 80 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सेहवाग सध्या कॉमेंटेटर म्हणूनही अनेक किस्से सांगताना दिसत आहे. इतकंच नाही तर सेहवागने वीरु के फंडे नावाचं यू-ट्यूब चॅनेलही सुरु केलं आहे. इथे सेहवागचे खास व्हिडीओ पाहायला मिळतात.