मुंबई : राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. या मोर्चांमध्ये सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे.


मोर्चाचं नियोजन, आयोजन, बैठक आणि प्रत्यक्ष मोर्चा हे सर्व सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत आहे. मात्र त्याचवेळी व्हॉट्सअॅपवरुन काही गैरसमजही पसरवले जात आहेत.

सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पद धोक्यात, मराठा समाजाचा मुख्यमंत्री होण्याच्या हालचालींना वेग' असे अफवा पसरवणारे मेसेज फिरत आहेत.

इतकंच नाही तर त्या - त्या जिल्ह्यातील मराठा नेत्याचं नाव घेऊन, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचंही छातीठोकपणे सांगितलं जात आहे.

या मेसेजमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होणार असल्याचं सूत्रांनी सांगितल्याची अफवाही पसरवली जात आहे.

व्हॉट्सअपवर फिरणारे, अफवा पसरवणारे काही मेसेज

1) फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात?

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार हालचाली. भाजपातील शहा यांच्या निकटवर्तीय मराठा नेत्याने भाजप श्रेष्ठींना दिला अहवाल.

गुजरातच्या पाटीदार आंदोलनाप्रमाणे हे आंदोलन चिघळल्यास गुजरात सारखीच महाराष्ट्रात भाजपाची अवस्था होऊ नये, म्हणून अमित शहा यांनी घेतलाय निर्णय़.

सर्वच आघाड्यावर नाकाम ठरलेले बोलघेवडे मुख्यमंत्री फडणवीस बदलाचे वारे. मुख्यमंत्रीपदी पंकजा मुंढे हव्यात असा सर्वच नेत्यांचा सूर.

मराठा नेतेही राजी ?

मुंबईत गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती. ?

2) चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्रीपदी निश्चित. कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची संधी.

असे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत.