चेन्नई: चेन्नईत आलेल्या वरदा वादळामुळे दक्षिण भारतासह अनेक भागात इंटरनेटचा स्पीड मंदावला आहे. तसेच आणखी काही दिवस इंटरनेटचा स्पीड कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारती एअरटेलसह अनेक टेलिकॉम कंपन्यांना याचा फटका बसला आहे.


एअरटेलनं जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे की, 'वरदा वादळामुळे समुद्राखालील केबल्सचं काहीसं नुकसान झालं आहे.  याचा काही प्रमाणात इंटरनेट सेवेवर परिणाम झाला असल्यानं अनेक ग्राहकांना इंटरनेटचा स्पीड कमी मिळत आहे.

कंपनीनं ग्राहकांना यासंबंधी सूचना पाठवली आहे. याविषयी बोलताना एअरटेलचे प्रवक्ता म्हणाले की, 'परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी आमची टीम काम करीत आहे. आतंरराष्ट्रीय इंटरनेट ट्रॅफिकला डायव्हर्ट करण्याचाही बंदोबस्त सुरु आहे.'

वरदा वादळामुळे चेन्नईत बरंच नुकसान झालं. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर टेलिफोन आणि विजेच्या ताराही तुटल्या आहेत.