नवी दिल्ली : ग्राहकांचा मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक आहे की नाही, याची घरबसल्या खात्री करता येईल, अशी सुविधा देण्याचा आदेश आधार प्राधिकरणाने (UIDAI) दूरसंचार कंपन्यांना दिला आहे. यामुळे सिम कार्डचा गैरवापर रोखता येईल, असं UIDAI चं म्हणणं आहे.


ही सुविधा दिल्यामुळे ग्राहकांना आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी लिंक आहे का, याची माहिती एका मेसेजद्वारे मिळवता येईल. शिवाय आपल्या आधार नंबरवर किती सिम कार्ड देण्यात आलेले आहेत, याचीही माहिती मिळेल. 15 मार्चपर्यंत ही सुविधा देण्याचा आदेश दिला आहे.

काही रिटेलर, ऑपरेटर किंवा दूरसंचार कंपन्यांचे एजंट नवी सिम देण्यासाठी, नंबरचं रिव्हेरिफिकेशन करण्यासाठी आधारचा दुरुपयोग करत असल्याचं समोर आलं आहे. हा दुरुपयोग करुन दुसऱ्या व्यक्तींना सिम जारी केलं जात आहे किंवा दुसऱ्यांचंच रिव्हेरिफिकेशन होत आहे. त्यामुळे या गोष्टीवर लक्ष ठेवण्याची सक्त ताकीद दूरसंचार कंपन्यांना देण्यात आली आहे.

15 मार्चपर्यंत ही सेवा देण्याचा आदेश दूरसंचार कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, 31 मार्च 2018 पर्यंत सर्वांना आपला मोबाईल नंबर आधारने रिव्हेरिफाय करावा लागणार आहे.

संबंधित बातमी :

मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा