मुंबई : व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया भारतात लोकप्रिय आहेत. फक्त तरुणच नव्हे, तर सर्वच वयोगटातील व्यक्ती ही अॅप्स वापरतात. आता व्हॉट्सअॅप, फेसबुक पाठोपाठ इन्स्टाग्रामही व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्याची चिन्हं आहेत.


'टेकक्रंच'च्या वृत्तानुसार लवकरच इन्स्टाग्रामवर ऑडिओ कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. फोटो अॅप अशी ओळख असलेलं इन्स्टाग्राम लवकरच चॅटिंग अॅप होणार आहे. आतापर्यंत फक्त टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सोय 'इन्स्टा'वर होती. मात्र आता तुम्हाला थेट संवाद साधता येणार आहे.

इन्स्टाग्रामवर कॉलिंग फीचर सुरु होण्याची चर्चा जानेवारी महिन्यातही झाली होती. 'डब्ल्यूएबीटाइन्फो' वेबसाईटवर इन्स्टाग्राममध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या आयकॉनची इमेज दिसली होती. मात्र ती अंतर्गत चाचणी असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत इन्स्टाग्रामकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही.

इन्स्टावर जेव्हा व्हिडिओ कॉलिंगची सुविधा येईल, तेव्हा इतर अॅपच्या तुलनेत वाढीव फीचर्स देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. स्नॅपचॅटवर लाईव्ह चॅट करताना फिल्टर्सचा ऑप्शन आहे. तो स्काईप, व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या मेसेजिंग अॅप्समध्ये नाही. इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी फेसबुकने 2015 मध्येच व्हिडिओ कॉलिंगला सुरुवात केली होती.

इन्स्टाग्रामचे सुमारे 80 कोटी सक्रीय यूझर्स आहेत. तर स्टोरीजचं फिचर नियमितपणे वापरणार्‍यांची संख्या 30 कोटींच्या जवळपास आहे. ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलिंगच्या सुरु करताना इन्स्टाग्रामकडे आणखी लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सक्रिय यूझर्सच्या संख्येत वाढ होऊ शकते.

इन्स्टाग्रामवर सध्या 'लाईव्ह' जाण्याची सुविधा आहे, मात्र व्हिडिओ कॉलिंग सुरु झाल्यास ते व्हॉट्सअॅप-स्काईपला भारी पडणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.