मुंबई : फेसबुकच्या लाईव्ह व्हिडिओला टक्कर देण्यासाठी ट्विटरने पेरिस्कोपच्या मदतीने ट्विटर अॅपमध्येच पेरिस्कोप लाईव्हचं अपडेट द्यायला सुरूवात केली आहे. स्मार्टफोन यूजर्सना अतिशय कमी बँडविड्थमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याची सुविधा देणारं 'पेरिस्कोप' हे अॅप ट्विटरने गेल्यावर्षी विकत घेतलं होतं.

 

त्यानंतर फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने भविष्यात फेसबुकही व्हिडिओ साईट असेल असं जाहीर केल्यानंतर, व्हिडिओ हा सोशल नेटवर्किंगचा नवा ट्रेंड असेल, यावर शिक्कामोर्तब झालं. लागलीच फेसबुकने लाईव्ह व्हिडिओ हा स्ट्रिमिंगचा पर्यायही उपलब्ध करून दिला. त्यालाच टक्कर देण्यासाठी ट्विटरने अँड्राईड आणि आयओएस अॅपमध्ये लाईव्हचं बटन जोडलं आहे. या बटनच्या माध्यमातून तुम्ही पेरिस्कोपच्या मदतीने इव्हेंटचं लाईव्ह स्ट्रिमिंग म्हणजे प्रक्षेपण करू शकाल.

 
काय आहे ट्विटर 'पेरिस्कोप'?
ट्विटरचाच यूजर पासवर्ड वापरून पेरिस्कोपच्या सहाय्याने कोणत्याही घटनेचं थेट प्रक्षेपण करणं यात आता काहीही नाविन्य उरलेलं नाही. मात्र ट्विटरने आपल्या अॅपमध्येच एक स्पेशल बटन देऊन ट्विटरवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात अधिक सुलभता आणली आहे.

 

 

तुम्हाला तुमच्या ट्विटर अॅपमधून नवीन ट्विट करायचा असेल तर तुम्ही ट्विटरच्या डायलॉग बॉक्समध्ये जाता, तिथे तुम्हाला ट्विटसोबत इमेज किंवा व्हिडिओ जोडायचा असेल तर तुम्ही कॅमेऱ्याच्या चित्रावर क्लिक करता, यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा वापरून स्टिल फोटो, तीस सेकंदापर्यंतचा व्हिडिओ किंवा तुमच्या स्टोरेजमधील एखादी आधीच सेव्ह करून ठेवलेली इमेज ट्विटसोबत पाठवू शकता. मात्र आता नव्या अपडेटनुसार यामध्ये लवकरच आता लाईव्ह स्ट्रिंमिंगच्या नव्या बटनची भर पडणार आहे.

 

 

ट्विटरच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची घोषणा 'रेडी टू गो लाईव्ह' म्हणजेच थेट प्रक्षेपणासाठी तयार आहात का? असा प्रश्न विचारून करण्यात आली आहे.

 

https://twitter.com/twitter/status/743160801339445249