मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाची 3 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हेच निमित्त साधत ऑनलाईन व्यासपीठावर ट्विटर संमेलनही घेतले जाणार आहे. 'मराठी वर्ड' या ट्विटर अकाऊंट ग्रुपने ट्विटर संमेलनाचं आयोजन केले आहे. 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ट्विटर संमेलन असेल. यामध्ये ट्विटरवरील मराठी यूझर्सना सहभागी होता येणार आहे.
ट्विटरवर आतापर्यंत इंग्रजी भाषिक यूझर्स मोठ्या प्रमाणावर दिसत होते. मात्र, आता मराठी यूझर्सचे प्रमाणही वाढले आहे. ट्विटरवर मराठी यूझर्सची वाढती संख्या पाहता 'मराठी वर्ड' या ट्विटर हँडलने 'ट्विटर संमेलन' आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. "मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.", असे 'मराठी वर्ल्ड' टीमकडून सांगण्यात येते आहे.
यंदाचे 'ट्विटर संमेलन' 3, 4, 5 आणि 6 फेब्रुवारी 2017 रोजी भरवलं जाणार आहे. चार दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून मराठी यूझर्स संमेलनात सहभागी होऊ शकतील.
यंदा ट्विटर संमेलनमध्ये काय असेल?
ट्विटर संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आहे आणि सोबत 12 हॅशटॅग देण्यात आले आहेत. या हॅशटॅगच वापर करुन व्यक्त होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
12 हॅशटॅग :
#माझीकविता
#माझीकथा
#माझाब्लॉग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनिय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझाछंद
संमेलनातील इतर उपक्रम :
1. ट्विट व्याख्यान : वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांचे व्याख्यान.
2. मराठी भाषेसाठीचे ठराव मांडणे.
3. मराठी भाषेसंबंधीच्या प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करणे.
4.शब्दकोडी,प्रश्नमंजुषा, नवशब्द निर्मितीचे उपक्रम.