पुणे : राज्यातील महापालिका निवडणूका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने टेक्नोसॅव्ही पाऊस उचललं आहे. उमेदवारांकडून आचारसंहिता भंग तर होत नाही ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सिटीझन ऑन पेट्रोलिंग' (COP) हे अॅप तयार केलं आहे. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाल्याचं लक्षात आल्यास या अॅपच्या मदतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार पोहचवता येणार


आहे. अँड्रॉईड फोनवर हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरुन प्रचाराला सुरवात झाल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराकडुन आचारसंहितेचा भंग झाल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं, तर त्या संदर्भातली तक्रार नागरिक या अॅपच्या मदतीनं निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू शकणार आहेत. पुणे महापालिकेचे मुख्य निवडणुक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी याबद्दलची माहिती दिलीय.

अँड्रॉईड फोनवर गूगल प्ले स्टोअरवरुन हे अॅप नागरिक डाऊनलोड करु शकणार आहेत. त्याच बरोबर या अॅपमध्ये तक्रार करणाऱ्या नागरिकांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिक निर्भयपणे हे अॅप वापरु शकणार आहेत. निवडणुकीच्या काळात उमेदवारांकडुन प्रचाराच्या भरात आचारसंहितेचं उल्लंघन होऊ शकतं. तसं काही आढळलंच तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करायची संधी नक्की घेऊ असं मत टेकसॅव्ही पुणेकरांनी व्यक्त केलं आहे.