न्यूयॉर्क: जगातील सर्वात मोठी मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरची मालकी मिळवण्यासाठी बलाढ्य कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. यामध्ये गूगल, सेल्सफोर्स आणि वॉल्ट डिस्नीसारख्या कंपन्यांमध्ये काट्याची टक्कर दिसत आहे. आता एका नव्या वृत्तानुसार या आठवड्यातच टविटरच्या मालकीसाठी लिलाव होण्याची शक्यता आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बीनिऑफ आपल्या कंपनीच्या गुंतवणूकदारांना आणि शेअर होल्डर्सना ट्विटरची मालकी मिळवण्यातील फायदे पटवून देत आहेत. त्यामुळे लिंक्डइनप्रमाणेच ट्विटरच्या खरेदीसाठी सेल्सफोर्सकडून मोठी बोली लावली जाण्याची शक्यता वॉल स्ट्रीट जर्नलने व्यक्त केली आहे.
लिंक्डइनच्या मालकीसाठी सेल्सफोर्सकडून मोठी बोली लावण्यात आली होती. मात्र त्याच्या वरचढ बोली लावून मायक्रोसॉफ्टने मिळवली. दरम्यान, सेल्सफोर्सने मायक्रोसॉफ्टकडून लिंक्डइनच्या अधिग्रहणामध्ये अडथळे निर्माण केले आहेत. कारण सेल्सफोर्सच्या मते, मायक्रोसॉफ्टने लिंक्डइनच्या अधिग्रहण प्रक्रीयेत नियनांचे उल्लंघन केले आहे.
तर दुसरीकडे ऑर्कुट आणि गूगल प्लसच्या माध्यमातून गूगलने सोशल मीडियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला होता. मात्र त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले होते. पण ट्विटरच्या खरेदीसाठी पुन्हा पुढाकार घेतला आहे. आपल्या नव्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून गूगल ट्विटर अॅपचा प्रसार करण्याच्या तयारीत आहे.
सध्या ट्विटरचे 31.3 कोटी अॅक्टिव्ह यूजर्स असून उत्पन्न वाढीसोबतच नव्या यूजर्सची संख्याही रोडावली आहे. त्यामुळे ट्विटरच्या विक्रीमध्ये 20 अब्ज डॉलर्सची बोली लावली जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.