मुंबई : ट्विटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिला कौल यांनी राजीनामा दिला आहे. महिमा कौल मार्च अखेरपर्यंत ट्विटरसोबत काम करतील आणि त्यांची जबाबदारी निभावतील, असं ट्विटरने म्हटलं आहे. महिमा कौल आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत, असंही ट्विटरने सांगितलं.
महिमा कौल ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र तरीही मार्चपर्यंत त्या आपली अधिकृत जबाबदारी पार पाडणार आहेत. महिमा कौल यांचा राजीनामा ट्विटरसाठी नुकसान आहे, परंतु पाच वर्षांच्या आपल्या कामानंतर जवळच्या आणि कौटुंबिक नात्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या इच्छेचा आदर करतो, असं ट्विटरने म्हटलं.
शेतकरी आंदोलनादरम्यान ग्लोबल सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून भारतात जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यात महिमा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येण्याच्या टायमिंटमुळे जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे. या संदर्भात सरकारने नोटिस देखील बजावली आहे. 30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन करण्यात न झाल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहेत.
ट्विटरसाठी भारत तिसर्या क्रमांकाचं मार्केट आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे पहिले आणि द्वितीय क्रमांकावर आहेत. भारतात ट्विटरचे कोट्यवधी यूजर्स आहेत, ज्यामध्ये अभिनेते, खेळाडू, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर व्यक्तींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या