मुंबई: देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 149व्या जयंतीचा उत्साह आहे. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याला वंदन केलं.
ट्विटरकडून खास हॅशटॅग
ट्विटरनेही महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपित्याला वंदन करण्यासाठी खास हॅशटॅग केले आहेत. इतकंच नाही तर या हॅशटॅगसोबत गांधीजींची इमोजीही दिसत आहेत. ट्विटर इंडियाने गांधी जयंतीनिमित्त तब्बल 9 हॅशटॅग गांधीजींच्या इमोजीसह केले आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या तीन भाषांचा समावेश आहे.
महत्त्वाचं म्हणजे हे हॅशटॅग आजपासून पूर्ण आठवडाभर कार्यरत राहणार आहेत. तुम्ही गांधी जयंतीनिमित्त ट्विट केल्यानंतर ट्विटरने दिलेले हॅशटॅग दिल्यास गांधीजींची इमोजी दिसेल.
#GandhiJayanti
#गाँधीजयंती
#ગાંધીજયંતિ
#MahatmaGandhi
#MKGandhi
#BapuAt150
#MyGandhigiri
#NexusOfGood
#MahatmaAt150
देशभरात विविध कार्यक्रम
गांधी जयंतीच्या निमित्ताने देशभरात सुरु असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन’ समाप्त होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनिया गुतारेससह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहण्याची शक्यता आहे.
वर्ध्यात काँग्रेसची बैठक
गांधी जयंतीच्या निमित्ताने आज वर्ध्यात काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारणीची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेस वर्किंग कमिटीचे 53 सदस्य उपस्थितत राहणार आहेत.
गांधीजींनी 1942 मध्ये वर्ध्यातून इंग्रजांना भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. त्याचाच आधार घेत काँग्रेस आज भाजप मुक्त भारतचा निर्धार करणार आहे. दुपारी 12.30 वा ही बैठक सुरु होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी 11.15 वा. राहुल गांधी सेवाग्राम गांधी आश्रमात पार्थना सभेत भाग घेतील. त्यानंतर इथे वृक्षारोपण होईल.
संबंधित बातम्या
Gandhi Jayanti: देशभरात गांधी जयंतीचा उत्साह